कोपरगाव: तालुक्यातील मौजे सडे गावात तब्बल तीन पिढ्यांपासून सुरू असलेला रस्त्याचा वाद तहसीलदार महेश सावंत यांच्या मध्यस्थीने अखेर मार्गी लागला. रुजू झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी 58 रस्त्यांचे वाद सामोपचाराने मिटवले असून, सडे गावातील हा 59 वा वादही सामोपचाराने निकाली काढण्यात आला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा सप्ताह साजरा केला जात आहे, त्यात प्रामुख्याने आनंद रस्ते, सर्वांसाठी घरे, उपयुक्तसाठी पूरक उपयोग, नाविन्यपूर्ण उपक्रम या तीन टप्प्या अंतर्गत सुरू केलेल्या उपक्रमाच्या कालावधीतच बांधावर जाऊन हा वाद सामोपचाराने मिटवण्यात यश आले आहे. (Latest Ahilyanagar News)
तहसीलदार सावंत यांनी स्वतः स्थळावर जाऊन वादी व प्रतिवादी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना भविष्यातील अडचणी समजावून सांगत योग्य मार्गदर्शन केले. सरपंच तसेच गावकरीही या चर्चेत सहभागी झाले.
यामुळे तीन पिढ्यांचा तणाव एका दिवसात संपुष्टात आला. या निर्णयामुळे 45 शेतकरी कुटुंबीयांचा दीर्घकाळचा प्रश्न सुटला. दरम्यान, मीना सुभाष बारहाते, निखिल, पियुष बारहाते, अभिजीत रघुनाथ बारहाते, ऋषिकेश एकनाथ बारहाते या वादी व प्रतिवादी यांनी तहसीलदार सावंत यांच्या लोकाभिमुख भूमिकेचे कौतुक केले.
ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, आमच्या तीन पिढ्यांचा जुना वाद आज मिटला, तहसीलदानी दिलेले मार्गदर्शन हा आमच्या सर्वांसाठी कायमचा दिलासा ठरला आहे. त्यामुळे गावात एकोपा, ऐक्याचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.