नेवासा : फळांचा राजा आंबा हे आपले राष्ट्रीय फळ. मात्र, या राजाला तालुक्यातील भेंडा बुद्रुक शिवारात मात्र स्थान नाही. कोणत्याही गावांच्या शिवारात आंब्याचे झाड नाही, असे शिवार बहुतेक नसावे. पण तालुक्यातील भेंडा शिवारात मात्र आंब्याचे एकही झाड नाही. येथे आंब्याचे झाड न दिसण्यामागे गावाने जपत ठेवत आणलेली परंपरा. काही गावे पूर्वापारपासून आपापली परंपरा जपत आले आहेत, अशीच आगळी वेगळी प्रथा या गावाने जपली आहे.
भारतीय उपखंड हे आंब्यांचे मूलस्थान मानले जाते. सुमारे चार हजार वर्षांपासून आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. याच आंब्याचे एकही झाड नाही असे भेंडा शिवार आहे. यामागे एक रंजक कथा आहे. संत नागेबाबा हे येथील ग्रामदैवत. भेंडा येथील वास्तव्य काळात संत नागेबाबा यांनी त्यांच्या मठालगत झाडे लावली. त्यात आंब्याचेही झाड होते. एका गुराख्याच्या जनावराने बाबांनी लावलेले हे आंब्यांचे झाड फस्त केले. त्यावरून बाबा व गुराखी यांच्यात वाद झाला.
त्यावर संत नागेबाबांनी मौन धारण केल्याचे गावात कळताच गावकरी मठात जमले व बाबांना मौन सोडण्याची विनवणी करू लागले. त्यावर बाबांनी गावकर्यांच्या विनंतीला मान देत मौन सोडले, पण ज्या आंब्याच्या झाडावरून हे घडले ते झाडंच या शिवारात नको, असे बाबांनी सांगितले. हा शाप असल्याची गावकर्यांची भावना झाली आणि तेव्हापासून या शिवारात कोणी आंब्याचे झाड लावले नाही ती परंपरा आजही या शिवारात जपली जात आहे. त्यामुळे आंब्याचे झाड नसलेले हे आगळे-वेगळे शिवार आहे. ज्ञानेश्वर साखर कारखाना याच शिवारात आहे. कृषी विज्ञान केंद्रही याच शिवारात आहे. मात्र तिथे व परिसरात आंब्याचे एकही झाड दिसत नाही ते यामुळेच.
भेंडा शिवारात आंब्याचे झाड नाही व लावलेही जात नाही. ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. ही परंपरा अजूनपर्यंत जपली जाते. झाड लावत नसले, तरी आंबे मात्र खाल्ले जात असल्याचे 73 वर्षाचे जेष्ठ नागरिक एकनाथ गव्हाणे यांनी सांगितले.