राजेश गायकवाड
आश्वी : संगमनेर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागल्याने, इच्छुक कार्यकर्त्यांनी पांढरा पेहराव करीत, जणू गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीची चाचपणी सुरू झाली आहे. आरक्षण कुठलेही निघू मात्र, आपण प्रवाहात आहोत, याची जाणीव करून देण्याची कार्यकर्ते अक्षरशः धडपडताना दिसत आहेत.
संगमनेर तालुक्यातील, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला जोर्वे जिल्हा परिषद गटात आरक्षणाचा विचार न करता, काँग्रेस- भाजपसह विविध इच्छुकांनी चाचपणी सुरू केली आहे. हा गट म्हणजे माजी मंत्री थोरातांचे ‘माहेर घर,’ तर मंत्री विखे पाटील यांचा ‘विधानसभा मतदारसंघ’ असल्याने विखे- थोरात कार्यकर्त्यांची येथे सरळ-सरळ लढत रंगणार आहे. दोन्हीकडून विविध नावांची जोरदार चर्चा होत असली, तरी थोरात - विखे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागल्याचे चित्र दिसत आहे.
संगमनेरच्या पूर्वेचा जोर्वे जिल्हा परिषद गट महत्त्वाचा मानला जातो. येथील निम्मी गावे माजी मंत्री थोरात यांच्या मतदारसंघातील, तर, निम्मी मंत्री विखे पाटील यांच्या मतदारसंघातील आहेत. या दोन्ही नेत्यांचा या गटावर मोठा प्रभाव आहे. विखे परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे. स्वतः चे गाव, विविध संस्थांसह, जुन्या ऋणानुबंधांमुळे माजी मंत्री थोरात यांचा येथे प्रभाव आहे. थोरात- विखे एकत्र असो, अथवा नसो, येथे 2019 सालापर्यंत सोयीचे राजकारण दिसले, मात्र गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विखे- थोरात काँग्रेसमध्ये असतानासुद्धा विखेंनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून, कार्यकर्त्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली.
मात्र अपक्षांची दाळ शिजली नाही, परंतू विरोधाची ठिणगी मात्र पडली. कुठलाही कार्यक्रम असो, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी केल्याचे दिसले. आता तर दोन्ही नेत्यांची भूमिका व पक्षही वेगळा झाल्याने, लोकसभा, विधानसभेत मोठा संघर्ष दिसला. दक्षिणेतून डॉ. सुजय विखे पाटील यांना पाडण्यात थोरातांची महत्वाची भूमिका होती, असे बोलले जाते. तीच मनाशी खूणगाठ ठेवून, डॉ. विखेंनी विधानसभेत थोरातांना पाडण्यासाठी रणनिती बजावल्याने संगमनेरात अमोल खताळ आमदार झाले. या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाची सत्तासूत्रे हाती घेण्यासाठी ते जोरदार फिल्डींग लागणार, हे मात्र निश्चित!
जोर्वे जिल्हा परिषद गट सोयीस्कर नाही. विविध जाती-धर्माचे, सुशिक्षित- सधन मतदार येथे आहेत. राजकारणाविषयी ते जाणकार आहेत. बागायत भाग असतानासुद्धा विखे - थोरातांभोवती कार्यकर्त्यांचे मोठे वलय दिसते. दोन्ही विधानसभांच्या सीमेवरील ही गावे आहेत. या गटात संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचा प्रभाव असला, तरी ते इच्छुक दिसत नाहीत. शेवटच्या क्षणी काहीही होवू शकते, तो भाग वेगळा. डॉ. जयश्री थोरात यांनी जोर्वे गट पिंजून काढल्याने थोरात गटाकडून त्यांचे नाव आघाडीवर आहे. विखे गटाकडून जोर्वेच्या सरपंच प्रिती गोकूळ दिघे अथवा, गोकूळ दिघे यांची नावे चर्चेत आहेत, मात्र थोरात- विखे यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे.
महायुतीचा घटक पक्ष रिपाईं (आठवले गट) कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने, जोर्वे व आश्वी गट त्यांना मिळण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने रिपाईं मेळावा घेणार आहे, असे तालुकाध्यक्ष आशिष शेळके म्हणाले.
विखे - थोरात या दोन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. हा सहकारी तत्वावरील समझोता समजला गेला, मात्र राजकारण म्हणून दोन्ही नेत्यांची भूमिका मात्र पक्षासोबत असल्याने, ‘महाविकास आघाडी’ विरोधात ‘महायुती’ असाचं सामना आगामी निवडणुकीत बालेकिल्ल्यापासून थेट जिल्ह्यात जोरदार रंगणार आहे, यात तीळमात्र शंका नाही.
जिल्हा परिषद जोर्वे गटातील अंभोरे गण ओपन अथवा प्रवर्ग पुरुष निघाल्यास थोरात गटाकडून माजी सरपंच भास्कर खेमनर, तर विखे गटाकडून मालुंजेचे माजी संरपच संदीप घुगे या दोन आक्रमक माजी संरपंचांमध्ये लढत रंगू शकते. थोरात गटाकडून तरुण कार्यकर्ता राहुल खेमनर इच्छुक आहे.