मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar News : चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ५.५० मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

Chaundi to Nimgav Daku Road

जामखेड पुढारी वृत्तसेवा - दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.

सूतगिरणीमुळे परिसरात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा २.७०० किलोमीटर लांबीचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने ३ कोटी ९४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी याच रस्त्यावर असल्याने ५.५० मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे स्वागत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी (ता‌.जामखेड,जि.अहिल्यानगर ) येथे होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी हेलिपॅड येथे आगमन झाले. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सुरेश धस, आमदार गोपीचंद पडळकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ.पकंज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT