Farmer Stike : संगमनेर : उजव्या कालव्यातून निमगाव खुर्द ते खळी या भागातील तर डाव्या कालव्यातून पिंपळगाव कोंझिरा ते लोहारे येथील कदमवस्ती भागातील विविध शेतकर्यांनी पाईपद्वारे पाणी उचलले. मात्र याची चाहूल लागतात प्रशासनाने कुठलीही पूर्व सूचना न देता रात्रीच्या वेळी हे पाईप फोडले. यामुळे संतप्त सुमारे 500 शेतकर्यांनी रात्री दोन वाजता ठिय्या आंदोलन करून जलसंपदा विभाग व प्रशासनाला धारेवर धरले.
सध्या निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तनातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. हे पाणी संगमनेर तालुक्यातून पुढे जात असताना तालुक्याला मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. डाव्या व उजव्या कालव्यातून मागील दोन वर्षात तीन आवर्तने झाली. मात्र संगमनेर तालुक्याला प्रत्येक वेळी डावलण्यात आले. याबाबत शेतकर्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी प्रशासनाला तालुक्यातील शेतकर्यांची मागणी रास्त असून त्यांना पहिले पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आपण काम करावे अशा सूचना दिल्या. मात्र प्रशासनाने सत्ताधार्यांच्या दबावामुळे प्रतिसाद दिला नाही.
हक्काचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. माजी मंत्री थोरात यांच्या माध्यमातून उजव्या व डाव्या कालव्यावरील विविध गावांमधील शेतकर्यांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचे पाईप उपलब्ध करून देण्यात आले. हे पाईप शेतकर्यांनी उजव्या व डाव्या कालव्यावर टाकून शेतीसाठी पाणी उचलले. उजव्या कालव्यावर निमगाव खुर्द ते खळी यामधील विविध गावांमधील शेतकर्यांनी पाईपद्वारे पाणी उचलले तर डाव्या कालव्यातून पिंपळगाव कोंझिरा ते लोहारे येथील कदम वस्ती शेतकर्यांनी पाईपद्वारे पाणी उचलले.
उन्हाळ्यात शेतकर्यांना पिण्यासाठी व जनावरांसाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे पाणी उचलले असताना प्रशासनाने मात्र शेतकर्यांची बाजू न ऐकता रात्रीच्या वेळी सर्व पाईप फोडून टाकले, त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले.
यावेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राहणे म्हणाले की,संगमनेर तालुक्याच्या बाहेरील 16 किलोमीटर लांबी करता 20 दिवस पाणी आणि अकोले व संगमनेर तालुक्यातील 75 किलोमीटर लांबी कालव्या करतात फक्त 17 दिवस पाणी हा कुठला न्याय असा संतप्त सवाल केला. दरम्यान, संतप्त शेकडो शेतकर्यांनी स्थानिक आमदार हे तलाव आणि बंधारे भरून देण्याच्या घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. पाईप फोडले जातात त्यावर ते काही बोलत नाही. प्रशासनावर कोणाचा धाक आहे. याबाबत नवीन लोकप्रतिनिधींनी सर्व बंधारे भरून घेऊन अशी पेपरबाजी केली. प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांशी काही घेणे देणे नाही.अशा आक्रमक भूमिका शेतकर्यांनी घेतली. इंद्रजीत थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शेतकरी शांत झाले.
यावेळी शेकडो शेतकरी व महिला रस्त्यावर उतरल्याने रात्रभर उजव्या व डाव्या कालव्यावर प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू होती. अधिकार्यांनी पाईप फोडल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. रात्री उशिरापर्यंत कालव्यावर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्री दोन वाजता सुमारे 500 शेतकर्यांनी शिरापूर येथे इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी शेतकर्यांशी चर्चा केली. परंतु शेतकर्यांची रास्त मागणी ऐकल्यानंतर पोलिस प्रशासनाने ही जलसंधारण अधिकार्यांना चुकीच्या गोष्टीची जाणीव करून दिली. शेतकर्याच्या आंदोलनाला यश आले असून यापुढे पाईप फोडणार नाही, असे अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिले.