नगर: नियोजीत शुक्रवारच्या (दि.5) बंदमध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा एक दिवसाचे वेेतन कपात करण्याची तंबी शासनाने भरल्यानंतरही शुक्रवारी शिक्षकांनी बंद पुकारलाच. शिक्षकांचा बंदमधील सहभागामुळे जिल्हा परिषदे, महापालिका व नगरपालिकेच्या 1806 शाळा बंद राहिल्या. 5514 शिक्षकांनी बंद आंदोलनात सहभागी घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
टीईटीसह अन्य प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक संघटनांनी शुक्रवारी (दि.5) शाळा बंद आंदोलनाचा एल्गार पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आवाहन केले होते. त्यावर शासनाने परिपत्रक काढत विद्यार्थ्यांचे नुकसान करून शाळा बंद ठेवू नयेत, अन्यथा मोर्चात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाईल, असा सक्त इशारा दिला होता. मात्र, शासनाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करत शिक्षकांनी बंदमध्ये सहभाग घेतला.
जिल्ह्यात जिल्हा परषदेच्या 1746 शाळा शुक्रवारी नेहमीप्रमाणे सुरू होत्या. मात्र, 1786 शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, 5514 शिक्षक शाळेवर नसल्याचेही शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत पुढे आले आहे.
याशिवाय मनपा व नगरपालिकेच्या 28 शाळा सुरू होत्या, तर 20 शाळांना टाळे असल्याने त्या ठिकाणचे 50 शिक्षक गैरहजर होते. जिल्ह्यातील 1806 शाळा शिक्षकाअभावी बंद असल्याचे निदर्शनास आले. आंदोलनात सहभागी शिक्षकांची आकडेवारी शासनाकडे पाठविण्यात आली आहे.
आंदोलनात सहभागी संघटना
प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, केंद्रप्रमुख संघटना, महानगरपालिका-नगरपालिका शिक्षक संघ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघ आणि शिक्षक सेना.