नगर: ‘100 मीटर रस्त्यावर 10-10 मीटरच्या अंतरावर किती झाडे लावता येतील?’ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सातवीच्या वर्गात अचानक विचारलेला हा प्रश्न ऐकताच काहींनी बोटावर मोजणी केली, काहींनी वहीत आकडेमोड केली, तर काहींनी गोंधळून गुरुजींकडे पाहिले. पण उत्तर मात्र कुणाकडेच नव्हते.
सीईओंनी आता तोच प्रश्न गुरुजींना विचारला; मात्र तेही अडखळले. त्यामुळे सीईओंचा पारा चढला आणि त्यांनी खडे बोल सुनावले. श्रीगोंदा तालुक्यातील एका शाळेत प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित दोन शिक्षकांसह विस्तार अधिकाऱ्यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.
त्याचे असे झाले... जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काही शाळांना सरप्राईज व्हिजीट देण्याचा निर्णय घेतला. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर केंद्रातील एका शाळेवर ते अचानक पोहचले आणि थेट सातवीचा वर्ग गाठला. शाळा पाहणीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांची बुद्धिमता व तर्कशक्ती तपासण्यासाठी प्रश्न विचारला.
10-10 मीटरवर एकेक झाड लावायचे आहे, तर 100 मीटर लांब जागेमध्ये किती झाडे बसतील? वर्गात शांतता पसरली. विद्यार्थी बोटांवर आकडेमोड करू लागले. काहीं जण वहीत गणित सोडवू लागले. अनेक जण तर गोंधळून गुरुजींकडेच पाहत होते. उत्तर मात्र कुणाकडेच नव्हते!
वर्गातली शांतता असह्य झाल्याने सीईओ भंडारींनी आपला मोर्चा गुरुजींकडे वळवला. पण गुरुजींच्याही चेहऱ्यावर बारा वाजल्याचे दिसत होते... सीईओंनी त्यांना विचारल्यावर तेही बोटांवर आकडेमोड करत विचारमग्न झाले. आता सीईओंनी डोक्याला हात लावला.
हा प्रश्न इतका अवघड होता की काय? सीईओंनी मग जरा सोपा प्रश्न विचारायचे ठरवले... ‘राहुल नावाचा मुलगा रांगेत पुढून सहाव्या क्रमांकावर आणि मागून चौथ्या क्रमांकावर आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?’ विद्यार्थ्यांनी पुन्हा अंदाज बांधायला सुरुवात केली. मात्र योग्य उत्तर हुलकावणी देत राहिले. अगदी गुरुजींनाही योग्य उत्तराने पुन्हा हुलकावणी दिली. त्यामुळे सीईओंनी त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
शिक्षकांसह विस्तार अधिकाऱ्यांनाही नोटीस
विसापूर केंद्रातील संबंधित शाळेतील दोन शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमतांचा अभाव दिसून आला. गणित आणि विज्ञान या विषयांच्या सोप्या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना आकलन नाही, शैक्षणिक साहित्याचा वापर दिसून आला नाही. ‘मिशन आरंभ’मध्ये सातवीचा निकालही शून्य दिसला.
याप्रकरणी शालेय कामकाजात कसूर केल्याचा ठपका ठेवून तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, यासाठी सात दिवसांत खुलासा सादर करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. कोणत्याही प्रकारचे पर्यवेक्षीय कामकाज व नियंत्रण ठेवेले नसल्याचा ठपका ठेवून त्या बीटच्या विस्तार अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावली आहे.
सीईओंचे गुणवत्तावाढीवर विशेष लक्ष
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा शिक्षण क्षेत्रावर विशेष भर आहे. आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य असल्याने, हे भविष्य चांगले घडावे, यासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या माध्यमातून गुणवत्तावाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
खासगीच्या तुलनेत झेडपीच्या शाळा वेगात आगेकूच करताना दिसत आहेत. अनेक शिक्षकांनी शिष्यवृत्तीच्या निकालातून ते दाखवूनही दिले, अशा शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतानाच, ज्या शिक्षकांच्या वर्गाची गुणवत्ता ढासळली आहे, त्यांना फैलावर घेण्याचे कामही सीईओंनी सुरू केले आहे.