कार्यक्षेत्र, नोकर भरतीसह सर्व 14 विषय मंजूर
तांबेंची शेरोशायरी अन् विरोधकांची गोलगोल भाषणे
नगर: गोंधळ अन् गदारोळाची परंपरा असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेची रविवारची सभा अनपेक्षितपणे शांततेत पार पडली. विरोधी संचालकांनी गोलमाल भूमिका घेत सत्ताधार्यांच्या सुरात सूर मिळवित भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले. सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांनी मांडलेल्या विषयाला विरोधकांनी विरोध न करता मंजूर.. मंजूर..चा जयघोष केल्याने नोकरभरतीसह सर्वच 14 विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
बँकेच्या सर्वसाधारण सभेची तारीख ठरविल्यापासून शेड्यूल्ड बँक, लाभांश, नोकर भरती या विषयांवरून विरोधकांनी जणू रान उठवल्याचे चित्र निर्माण केले. त्यामुळे शिक्षक बँकेची वार्षिक सभा वादळी होण्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र रविवारी प्रत्यक्ष सभेवेळी सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब तांबेंसमोर मुख्य विरोधी नेत्यांनी तलवारी अक्षरशः म्यान केल्याच्या दिसले. एवढेच नव्हे तर काहींनी भविष्यात बापूंशी जुळवून घेण्याचेही संकेत दिले. बापुंनीही तुकोबांच्या ओवीपासून ते हिंदी शेरोशायरीतून राहिल्या साहिल्या विरोधाचीही हवा काढून घेतली. त्यामुळे गुरुजींची सभा खेळीमेळीतच झालीच.
शिक्षक बँकेची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. व्यासपीठावर अध्यक्ष बाळासाहेब तापकीर, उपाध्यक्ष योगेश वाघमारे, संचालक बाळू सरोदे, रमेश गोरे, रामेश्वर चोपडे, निर्गुणा बांगर, संदीप मोटे, कैलास सारोक्ते, भाऊराव राहींज, महेंद्र भनभने, सुर्यकांत काळे, शशिकांत जेजूरकर, कल्याणराव लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, कारभारी बाबर, आण्णासाहेब आभाळे उपस्थित होते.
सभेच्या प्रास्ताविकात अध्यक्ष तापकीर यांनी संस्थेची आर्थिक स्थिती मांडली. शिवाय, सभा शेवटपर्यंत चालवू. सभासदांनी शांततेत प्रश्न विचारावेत, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील असल्याचे सांगितले. सुरुवातीलाच, अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असा बदल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
त्यानंतर शेड्यूल्ड बँक, स्टार्पींग पॅटर्न, कर्मचारी भरती यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेत संतोष खामकर यांनी कर्जाची मर्यादा पाच टक्के वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नवनाथ आडसूळ यांनी नेवाशातील मृत सभासदाच्या वारसास 15 लाखांचे बँकेतून अर्थसहाय केल्याबद्दल तत्कालिन अध्यक्ष सरोदे यांचे आभार मानले. तसेच एमडी पदासाठी आपले कोणी लायक नव्हते का, नवीन एमडी तीन दिवसांत निवडले कसे, असा सवाल केला. प्रकाश दळवी यांनी जोपर्यंत बापूंच्या ताब्यात सत्ता आहे, तो पर्यंत बँकेत चुकीचे काहीही होऊ शकत नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विकास डावखरे यांनी मागील नऊ महिन्याच्या कारभारावर तोंडसुख घेताना, शेड्यूल्ड बँकेबाबत फायदे व तोटे सभागृहासमोर मांडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाळासाहेब सालके यांनीही शेड्यूल्ड बँकेच्या हट्टाबाबत चिंता व्यक्त केली. अशोक निमसे यांनी सभासदांवर निर्णय लादल्यास बहुजन मंडळाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. आबासाहेब जगताप, अविनाश निंभोरे यांनी संबंधित विषयांबाबत सडेतोड मत मांडले.
यावेळी साहेबराव अनाप, नारायण पिसे, भास्करराव नरसाळे, एकनाथ व्यवहारे, अनिल साळवे, शाम राठोड, संजयकुमार लाड, अनिल साळवे, सुदर्शन शिंदे, रघुनाथ झावरे, दत्ता चोथे, जनार्धन काळे, दत्तात्रय बारवेकर, विठ्ठल वराळे, सुनील शिंदे, पांडुरंग देवकर, संतोष ठाणगे, लक्ष्मण चेमटे यांच्यासह हजारो शिक्षक सभासद उपस्थित होते.
शिक्षक राजकारणात बापूसाहेब तांबे मुरब्बी आहेत. सभेच्या एक दिवस अगोदर संघर्षाची भाषा करणारे विरोधक सभेत सत्ताधार्यांची भाषा बोलताना दिसले. त्यामुळे नेमके ‘त्या’ आदल्या रात्री काय घडले.., आपल्या नातेवाईकांची बँकेतील सुरक्षितता, नोकर भरतीतील ‘जागा’ की अन्य काही...या बाबतीत सभास्थळी सभासद आणि त्यांचे सहकारीच खासगीत शंका उपस्थित करत होते. आता यात खरं काय आणि खोटं काय, हे ज्यांना त्यांनाच माहिती..!.
किडणी प्रत्यारोपनाची माहिती देतानाच, गावचे शहाणपण म्हणजे प्राथमिक शिक्षक असतात, आजच्या सभेमध्ये शिक्षकांच्या खुर्च्या काढून घेतल्या, त्याचे कारण आपण समजू शकतो, मात्र शिक्षिकांना खुर्च्या हव्या होत्या, अशा शब्दात महिला शिक्षिका चव्हाण यांनी ‘त्या’ गोंधळ घालणार्या शिक्षकांचे सुरुवातीलाच कान उपटले. तर नेवासा येथील शिक्षिका मनिषा वाकचौरे यांनी सभासदांच्या सुखःदुःखात बँक मागे उभी राहत असल्याने संचालकांच्या कारभाराच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात मोठा प्रतिसाद दिला.
उत्पन्न वाढले की खर्च वाढतो, हे साध गणित आहे. लाभांश कमी द्यावा लागला. त्यामुळे कोणाला दोष देण्याची गरज नाही. मात्र ज्यांचा साहित्यिक म्हणून आम्ही आदर करतो, ज्यांनी बँक चालवली आहे, ते जर म्हणत असतील की या नफ्यावर आम्ही सात टक्के लाभांश देऊन दाखवतो, तर याच ठिकाणी मी लगेच दोन्ही पदाधिकार्यांना राजीनामा द्यायला लावतो, असे खुले आव्हान बापू तांबे यांनी डॉ. कळमकर यांचे नाव न घेता दिले.
संचालक कोणाचेही नाहीत. त्यामुळे आपापसात भांडू नका. बापूसाहेब तांबे आणि आम्ही विरोधक जरी असलो, तरी कदाचित उद्या बापू आणि मी सोबत असू शकतो, असे विधान करताच सभागृहात टाळ्या कडाडल्या. तर शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. एवढेच नव्हे तर निष्णात पुढार्यांनी आम्ही एकत्र येऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट करत येणार्या नव्या राजकीय समिकरणांचेही संकेत दिले. दरम्यान, ठुबे यांचा निशाणा नेमक्या कोणत्या ‘गुरुजी’कडे होता, याची उघड चर्चा सुरू होती.
ऐक्य मंडळाचे नेते शरद वांढेकर यांनी शेड्यूल्ड बँकेचे स्वप्न आवश्यक पहा, पण त्यापूर्वी त्याचे तोटेही जाणून घ्यावेत, किंवा शिक्षक बँकेची नगर अर्बन बँक होऊ नये, याची दक्षता घ्या. तसेच बँकेने वाटलेला 87 लाखांचा फरक संबंधित कर्मचार्यांपर्यंत पोहचलाच नाही, असा खळबळजनक दावा करत ऐक्य मंडळ चांगल्या निर्णयाला समर्थन देईल मात्र चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याचे तत्व कधीही सोडणार नाही, अशी भूमिकाही स्पष्ट केली. येणार्या काळात बँकेचा नफा वाढणार आहे, त्यामुळे कर्जावरील व्याजदर कमी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्ता कोणाचीही असो, सभासदांनी प्रश्न विचारले पाहिजे आणि संचालकांनीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायलाच हवीत. हीच जिवंत लोकशाहीची लक्षण आहेत. मात्र आज प्रश्न विचारतानाच केवळ विरोधाला विरोध करू नका. त्यामागची कारणेही समजून घ्या, नोकर भरतीची मला हौस नाही, मात्र रिझर्व्ह बँकेचा दंड वाचवायचा असेल तर काही विभाग सुरू करावे लागतील, ते समजून घ्या. ‘ज्यांची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा’ या तुकोबारायांच्या अभंगातील ओवीचा परामर्श देताना आपल्या संचालकांनी सदैव सभासद हित जोपासल्याचे ठामपणे सांगितलेच, शिवाय, कमजोरी मत ढूंढ मुझमे मेरे दोस्त, एक तु भी मेरे कमजोरी मे शामील है..! ही शायरी वापरताना बापू तांबे यांनी विरोधकांनाही चिमटा काढल्याचे दिसले.
कळमकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे सभेचे त्यांच्याकडे लक्ष होते. मात्र सभेस्थळी ते दिसले नाहीत. अखेर पहिल्या अंकावर (बापूंचे भाषण झाल्यावर) पडदा पडल्यानंतर साहित्यीक सभास्थळी अवतरले. डॉ. कळमकर यांनी नेहमीच्या शैलीत तांबेंची फिरकी घेताना, साहित्यीक आजीव असतो, मात्र नेतेपद कायम नसते, असा कोपरखिळी मारली. तर 35 वर्षे सभा गाजवल्या, माझ्याकडून काहींची मने दुखावली गेली असतील, कोणावर टिका टिप्पणी झाली असेल, मात्र आजची ही माझी शेवटची सभा असेल. यापुढे सभेला मी नसेल. बँक चांगली जपा, असे भावनिक आवाहन केले. यावेळी कळमकर यांना भावना लपविता आल्या नाहीत. तर सर्व सभागृहाने उभे राहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसले.