

नगर : मुळा धरण उच्चस्तरीय उजव्या कालव्याच्या (वांबोरी चारी टप्पा : 1) स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत घटकांच्या दुरुस्तीसाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत 14 कोटी 60 लाख 62 हजार रुपये खर्चास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामानंतर 3 हजार 568 हेक्टर अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे.
मुळा धरणाचे पाणी ज्या भागाला मिळत नाही अशा राहुरी, नेवासा, अहिल्यानगर व पाथर्डी या तालुक्यांतील अवर्षण प्रवण भागातील 43 गावांतील 102 तलावांना पाणी देण्यात येते. याव्दारे अवर्षण प्रवण भागातील 3 हजार 568 हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्ष सिंचन होते. या भागास शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून मुळा प्रकल्पातून मुळा उच्चस्तरीय उजवा कालवा (वांबोरी चारी टप्पा बांधण्यात आलेला आहे.
ही योजना 2007-08 पासून कार्यान्वित होऊन आजपर्यंत मूळ निविदेतील बरीचशी कामे अपूर्ण राहिल्यामुळे या योजनेची विशेष दुरुस्ती अंतर्गत यांत्रिकी, विद्युत व स्थापत्य कामे करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने पंप हाऊस, सबस्टेशन व वितरण व्यवस्था, एअर वॉल्व नवीन बसविणे, चेंबर दुरुस्ती, चेंबर वॉल्व व इतर आवश्यक कामांचा समावेश आहे.
त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे अंतर्गत मुळा उच्चस्तरीय उजवा कालव्याच्या स्थापत्य व विद्युत घटकांच्या दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत 14 कोटी 60 लाख 62 हजार 716 रुपये खर्चाच्या प्रस्तावास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत शासनाने 7 जुलै 2025 रोजी अध्यादेश जारी केला आहे.
यांत्रिकी, विद्युत व स्थापत्य विभागाची दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर 3 हजार 568 हेक्टर अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित करण्याची सर्व जबाबदारी कार्यकारी अभियंता याची असणार आहे. पाणीपटटी वसुलीत वाढ करण्याची जबाबदारी सर्व क्षेत्रीय अधिकार्यांची असणार असल्याचे शासन अध्यादेशात म्हटले आहे.
14 कोटी 60 लाख 62 हजार रुपये खर्चाच्या प्रशासकीय मान्यतून 8 कोटी 64 लाख 77 हजार रुपये किंमतीचे बांधकाम होणार आहे. 81 लाख 44 हजार 919 रुपये खर्चाचे विद्युतीकरण याशिवाय 2 कोटी 57 लाख 81 हजार रुपये खर्चाचे यांत्रिकी कामे पूर्ण केले जाणार आहे.