Adinath Maharaj Tarkeshwar Gad Pudhari
अहिल्यानगर

Adinath Maharaj Tarkeshwar Gad: तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री जखमी; प्रकृती स्थिर

पाथर्डीत स्वतःवर वार केल्याची धक्कादायक घटना; अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू, भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी घडली. या घटनेमुळे तारकेश्वर गडाच्या भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महाराजांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास आदिनाथ महाराज शास्त्री हे गडावरील गोशाळेच्या मागील डोंगर परिसरात गेले. तेथे त्यांनी स्वतःवर धारदार शस्त्राने वार करून घेतले. ही बाब लक्षात येताच गडावरील सेवेकरी व भाविकांनी तातडीने धाव घेत त्यांना पाथर्डी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रक्तस्राव जास्त होत असल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप तसेच जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात जाऊन महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

तारकेश्वर गडाचे संस्थापक नारायण महाराज यांच्या निधनानंतर गडाच्या विकासाची धुरा आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सांभाळली आहे. त्यांच्या पुढाकारातून येथे भव्य भक्तनिवास, गोशाळा, वृक्षारोपण, अन्नदान आदी विविध उपक्रम सुरू असून गडाचा विकास झपाट्याने सुरू आहे. अशा परिस्थितीत ही घटना घडल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भक्तांनी मागील काही घटनांचा संदर्भ देत आदिनाथ महाराज शास्त्री यांना कोणी जाणूनबुजून त्रास देत आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच त्यांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याची मागणीही भक्तपरिवाराकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच अनेक भाविकांनी थेट अहिल्यानगर येथे धाव घेतली. तालुकाभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू होती.

अत्यंत शांत आणि संयमी स्वभावामुळे आदिनाथ महाराज शास्त्री सर्वपरिचित आहेत. काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका राजकीय व्यक्तीकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी कोणालाही न सांगता काही काळासाठी तारकेश्वर गड सोडला होता, अशीही माहिती समोर येत आहे. अयोध्येच्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ज्या मोजक्या प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण होते, त्यात आदिनाथ महाराजांचा समावेश होता.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या तारकेश्वर गड ते पंढरपूर दिंडीला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कारही मिळाला होता. राज्यात तारकेश्वर गडाला मानणारा मोठा भाविक वर्ग आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीही गडाला भेट देत विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. दरम्यान, सध्या आदिनाथ महाराज शास्त्री यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

पुन्हा गडावर परतणार...

दरम्यान, आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रकृती आता चांगली असल्याचे सांगत, लवकरच आपण पुन्हा तारकेश्वर गडावर परतणार असल्याची माहिती दिली. तसेच सर्व भाविकांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT