नगर: शहरातील ढवण वस्ती परिसरात दि. 2 जून रोजी प्रमोद घोडके याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या भिमराज आव्हाड व राहुल सांगळे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर पुण्यातून बेड्या ठोकल्या.
या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी तिघांना अटक केली होती. परंतु गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आव्हाड हा गुन्हा घडल्यानंतर पळुन गेलेला होता. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले. (Latest Ahilyanagar News)
त्यानुषंगाने पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक वाघ, अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, अशोक लिपणे, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केलेले होते.
दि. 15 जून 2025 रोजी पथक गोपनिय माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत असताना भिमराज आव्हाड व राहुल सांगळे हे केसनंद, ता. जि. पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने पुणे या ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.
भिमराज आव्हाड यांचेविरुध्द यापुर्वी मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो जामीनावर आहे. तसेच राहुल विजय सांगळे याचेविरुध्द दंगा, मारहाणीचे 2 गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपीतांना गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पो. नि. आनंद कोकरे हे करणार आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.