राहुरी: राजकीय नेत्यांच्या अस्मिततेचा मुद्दा बनलेल्या डॉ. तनपुरे कारखान्यासाठी 59 टक्के सभासदांनी मतदान केले. कारखान्याच्या सत्तेसाठीत झालेल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, याचा फैसला आज रविवारी (दि.1जून) होणार आहे.
मतदान घडवून आणण्यासाठी कारखाना कार्यस्थळी राजकीय नेत्यांची लगबग दिसून आली. सुरूवातीला मतदान अत्यंत संथ गतीने सुरू झाले. पहिल्या दोन तासात 10 वाजेपर्यंत केवळ 7.78 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला काहीशी गती प्राप्त होऊन आकडेवारी 20.90 टक्के इतकी झाली. (Latest Ahilyanagar News)
दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागल्याने 2 वाजेपर्यंत 38.06 टक्के तर 4 वाजेपर्यंत 54.95 टक्के मतदान झाले. निवडणूक प्रशासनाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5 वाजता 21 हजार 283 मतदारांपैकी 12 हजार 662 (59.49 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ब वर्ग सभासदांमध्ये संस्थांच्या 190 प्रतिनिधींपैकी 188 जणांनी मतदान दिले आहे.
अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ, राजू शेटे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ, अरुण कडू, अजित कदम, पंढरीनाथ पवार यांच्या कृती समितीत सत्तेसाठी तिरंगी लढत झाली.
राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे मतदान प्रक्रिया पार पडली. प्रांताधिकारी डॉ.किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शक आणि अधिकारी व कर्मचार्यांनी मतदान प्रकिया सुरळीत पार पाडली.