बोधेगाव: ताजनापूर लिफ्ट टप्पा 1 योजनेंतर्गत वरूर-आखेगावसह 13 गावांतील बंधारे, शेततळे व गावतलाव भरून मिळावेत, यासाठी पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लवकरच या गावांतील नागरिकांचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते शिवाजीराव काकडे यांनी दिली.
वरूर-आखेगावसह 13 गावांतील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक रविवारी (दि. 18) शेवगाव येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक सकाहारी भापकर होते. या वेळी रंगनाथ ढाकणे, महादेव जवरे, लक्ष्मणराव गवळी, बंडूभाऊ बोडखे, तबाजी बोडखे, बाळासाहेब काटे, सोमनाथ तेलोरे, गणेश धावणे, आदिनाथ धावणे, राजेंद्र फलके, गोरक्ष भोसले, डॉ. हेमंत काटे, नामदेव ढाकणे, नवनाथ ढाकणे, विश्वास ढाकणे, नवनाथ शिरसाठ, लहू जायभाये, शेषराव टेकाळे, अनिल लांडे, बन्सी बोडखे, मिठू जायभाये, रामनाथ भालेराव, भीमसेन गिरमकर, श्रीरंग हुलजुते, गोरक्ष वावरे, डॉ. अंकुश दराडे, ज्ञानदेव वीर आदी उपस्थित होते.
या वेळी काकडे म्हणाले, 2019पासून या योजनेतून 13 गावांतील बंधारे, गावतलाव व शेततळे भरून मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही योजना शासनाकडून मंजूर करून घेतली. आता प्रत्यक्ष कामाला गती मिळावी व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाटबंधारे मंत्र्यांची शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार आहे. या योजनेमुळे दुष्काळी गावांना न्याय मिळून शेती बागायती होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या या गावांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आम्ही थोडे थांबलो होतो; मात्र 13 गावांतील नागरिकांच्या आग्रहामुळे पुन्हा एकत्र येत हा लढा उभा करत आहोत. काम पूर्ण होईपर्यंत पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने हा संघर्ष यशस्वी करायचा आहे, असे आवाहनही काकडे यांनी केले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या काकडे, लहू जायभाये, ज्ञानदेव वीर, मारुती ढाकणे, भाऊसाहेब सातपुते यांनी मते मांडली. प्रास्ताविक लक्ष्मण गवळी यांनी केले. कृष्णा ब्राह्मणे यांनी आभार मानले.
ताजनापूरच्या या जललढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 13 गावांतील महिलाही सक्रिय सहभाग घेणार आहेत.मीनाताई डावरे, खरडगाव