आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे शासकीय यंत्रणांना निर्देश  Pudhari
अहिल्यानगर

आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे शासकीय यंत्रणांना निर्देश

'कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये'

पुढारी वृत्तसेवा

नगर: मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सर्वोतोपरी सज्ज राहावे. संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व विभागाचे अधिकारी समन्वयाने कार्य करत, कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अधिकार्‍यांना दिले.

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. (Ahilyanagar News update)

डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सुरक्षित निवार्‍यांची पाहणी करून त्याचे सूक्ष्म नियोजन करावे. त्या ठिकाणी अन्नधान्य, पाणी, औषधी आदींची पुरेशी व्यवस्था असावी. आपत्तीच्या काळात विद्युत पुरवठा व दूरध्वनी सेवा अखंडित सुरू राहील, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.

पूरप्रवण व तलाव क्षेत्रामध्ये गाव-शोध व बचाव पथकांची व्यवस्था चोख ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक शासकीय रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करा, शोध व बचाव साहित्यांमध्ये बिघाड असल्यास तातडीने दुरुस्त करा, महापालिका व नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करा, शहरांमधील ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

धोकादायक पुलांची सुरक्षा तपासा

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पुलांचे सर्वेक्षण करावे. धोकादायक पुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. दरड कोसळणार्‍या ठिकाणी चेतावणी फलक लावावेत. झाडे रस्त्यावर उन्मळून पडून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. पुरामुळे पाणीपुरवठा योजना बाधित होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबरोबरच पूरपरिस्थितीत सातत्याने पाण्याचे नमुने तपासावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT