सुरत ते चेन्नई महामार्ग  Pudhari
अहिल्यानगर

Nitin Gadkari : ‘सुरत-चेन्नई’मुळे होईल औद्योगिक विकास : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari : सुरत ते चेन्नई रस्त्यामुळे हे अंतर 320 किलोमीटरने, तर नाशिक ते सोलापूर अंतर 135 किलोमीटरने कमी होणार

पुढारी वृत्तसेवा

Nitin Gadkari on surat to chennai highway

शिर्डी : सुरत ते चेन्नई हा 1600 किलोमीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग असून त्यापैकी सुमारे 481 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार आहे. या रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने जागा संपादन करून औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क उभे केल्यास पाचही जिल्ह्यांतील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोणी येथे व्यक्त केला.

326 कोटी रुपये खर्चाचा नांदूर शिंगोटे ते कोल्हार 160 डी राष्ट्रीय महामार्ग सुधारणा, 750 कोटी रुपये खर्चाचा नगर- आष्टी- चिंचपूर रस्ता, 390 कोटींचा बेल्हे- अळकुटी- निघोज- शिरूर रस्ता आणि 11 कोटींचा श्रीगोंदा शहरातील पूल, अशा एकूण 1380 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि 9) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व राजाभाऊ वाजे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सर्व आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, डॉ. किरण लहामटे, विठ्ठल लंघे व मोनिका राजळे; माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रशांत फेगडे, अधीक्षक अभियंता दयानंद विभूते आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, की सुरत ते चेन्नई रस्त्यामुळे हे अंतर 320 किलोमीटरने, तर नाशिक ते सोलापूर अंतर 135 किलोमीटरने कमी होणार आहे.

भारतमाला प्रकल्प रद्द झाल्याने या रस्त्याच्या भूसंपादनासाठी नवीन प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. महिनाभरात या प्रकल्पाला मान्यता मिळेल. या रस्त्यांसाठी जमीन संपादनाचा मोबदला तातडीने देऊन कामालाही सुरुवात होेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विखे पाटील म्हणाले, की रस्ते विकासाची अशक्य वाटणारी कामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पकतेतून पूर्ण झाली आहेत. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक भाविक अहिल्यानगरसह शिर्डीमध्ये येणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर-शिर्डी या रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घेऊन हे काम वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत कसारा फाटा ते कोल्हारपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली.

अहिल्यानगर-धुळे महामार्ग सहापदरी करणार

अहिल्यानगर-धुळे या बीओटी रस्त्याची मुदत संपल्याने राष्ट्रीय महामार्गाने रस्ता कामाचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. उपलब्ध जागेनुसार हा रस्ता सहापदरी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच नगर-करमाळा- सोलापूर या 80 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कामाची निविदाही निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणाले. अहिल्यानगर - शिर्डी या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वासही श्री.गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT