Ram Shinde Pudhari
अहिल्यानगर

Karjat Jamkhed Politics: राम शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व; सुनील शेलार यांचा विरोधकांना टोला

जिल्हा बँक, नगरपंचायत निवडणुकांचा दाखला देत संघटनात्मक ताकद केली अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: सभापती राम शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे. पक्ष आणि नेतृत्वाच्या माध्यमातून नेहमीच कार्यकर्त्यांना पदे देऊन मोठे करण्याचे काम केले गेले,’ असे सुनील शेलार यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष छाया शेलार यांचे पती असलेल्या सुनील शेलार गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

नुकत्याच झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा जिंकल्या व जिल्ह्यातील मातब्बरांना व विरोधकांना चोख उत्तर दिले, असे सांगून शेलार म्हणाले की, कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये जामखेड बाजार समिती निवडणूक असो, की जामखेड आणि कर्जत नगरपंचायतींवर मिळालेले यश असो, या सर्व ठिकाणी राम शिंदे यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळेच यश मिळाले.

पक्षीय ताकदीचा दाखला देताना सुनील शेलार म्हणाले की, ‘जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण ७५ मतदार असताना आम्ही आमची ताकद दाखवून दिली. त्या निवडणुकीत तब्बल ५४ मते मिळवून मोठा विजय संपादन केला. यावरून आमचे संघटन आणि ताकद किती मजबूत आहे, हे विरोधकांना कळून आले असेल.

संबंधित राजकीय गणिते आणि संघटनात्मक बांधणीवर बोलताना सुनील शेलार यांनी आगामी काळातील रणनीती स्पष्ट केली. या भागातील कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षीय विस्तार अधिक वेगाने केला जाईल आणि राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पदे मिळूनही काही जण उलटले..

शेलार यांनी काही स्थानिक बाबींवर अत्यंत संयत भाषेत भाष्य केले. ते म्हणाले की, ‘भूतकाळात कायदा बदलल्यामुळे नगराध्यक्षपद काहींना मिळाले अन्यथा ते कधीही नगराध्यक्ष झाले नसते. प्रा. राम शिंदे यांच्यामुळेच आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली.

नेतृत्व नेहमीच विश्वासाने पदे देते, त्यामुळे मिळालेल्या पदाची आणि विश्वासाची जाण ठेवून सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे होते. मात्र, काहींनी शब्द पाळला नाही त्यामुळे नंतर अविश्वास ठराव आणण्याची वेळ आली.

प्रत्येकाने निवडणुकीत स्वावलंबी होऊन लढायला शिकले पाहिजे आणि ज्यांनी राजकीय प्रवासात मदत केली, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायला हवी,’ अशी सौम्य अपेक्षा शेलार यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT