

आश्वी: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुजय विखे पाटील गट एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मात्र, थोरात-विखे ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एकत्र राहणार का? की पुन्हा राजकीय मैदानात स्वतंत्र भूमिका घेणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक संपली असली, तरी राजकीय चर्चांचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. संगमनेरातून रणजितसिंह देशमुख, गणपत सांगळे हे दोन संचालक बँकेत पोहचले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही उर्जा मिळाली आहे. ती उर्जा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कामी येणार आहे.
ज्याची पाच वर्षांपासून प्रतीक्षा आहे, ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक काही दिवसांवर दिसत आहे. त्यामुळे बँकेचे वातावरण तापलेले असतानाच, आता गट-गणात देखील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
आश्वी व जोर्वे गटात कार्यकर्त्यांकडून तशी तयारीही सुरू झाली आहे. मात्र, बँकेप्रमाणेच या निवडणुकीतही थोरात-विखे यांची सहकारातील एकजूट कायम राहणार, की दोन्ही गट पुन्हा स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, यावरच इच्छुकांचे गणित जुळणार आहे.
दरम्यान, पक्षीय चिन्हावर निवडणूक झाल्यास थोरात-विखे गट पुन्हा एकमेकांसमोर उभा राहणार असून, यातून आश्वी आणि जोर्वे गटात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक दिसणार का, याकडेही लक्ष असणार आहे.