Sunetra Pawar Meets Vikhe Patil Pudhari
अहिल्यानगर

Sunetra Pawar Meets Vikhe Patil: पवार-विखे संघर्ष निमाला! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विखेंच्या निवासस्थानी खास औंक्षण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी लोणी येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

पुढारी वृत्तसेवा

नगर/आश्वी: अहिल्यानगर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना गुरुवारी लोणी येथे घडली. गेल्या साडेतीन दशकांपेक्षा जास्त चालत आलेला विखे आणि पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निमित्ताने संपूर्णतः संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी लोणी येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याने विखे पाटलांच्या घरी जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सहकाराचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर ज्येष्ठ कृषितज्ज्ञ आप्पासाहेब पवार यांच्या रूपाने काही काळ विखे-पवार कुटुंबामध्ये जवळीक होती. मात्र, त्यानंतरच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यात राजकीय ठिणगी पडली आणि हा संघर्ष तीव्र होत गेला.

१९९१च्या लोकसभा निवडणुकीनंतर या संघर्षाने टोक गाठले होते. दिवंगत शंकरराव चव्हाण यांना बाळासाहेब विखे पाटील यांनी दिलेली साथ आणि पवारांशी घेतलेला राजकीय पंगा, यामुळे हा वाद तब्बल ३६ वर्षे धुमसत राहिला. मात्र, आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विखे पाटील यांच्या घरी पाऊल ठेवल्याने या संघर्षावर पडदा पडल्याचे मानले जात आहे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोणी येथे आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सुनेत्रा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमापूर्वी विखे पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सुनेत्रा पवार यांचे निवासस्थानी आगमन होताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले, तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी त्यांचे औक्षण केले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अमोल खताळ, आमदार अक्षय कर्डिले, अविनाश आदिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विखे-पवार यांच्यातील हा समेट जिल्ह्याच्या आगामी राजकारणात कोणती नवी समीकरणे जुळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमचे चुलतसासरे प्रवरा परिसरात होते. सहकाराच्या माध्यमातून पवार आणि विखे यांचे जुने स्नेहाचे संबंध राहिले आहेत.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
राजकारणात संघर्ष असतोच; पण तो केवळ वैचारिक असतो. आमच्यात कधीही व्यक्तिगत वैर नव्हते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत ना. विखे पाटील यांनी मंत्रिमंडळात काम केले आहे. आज सुनेत्राताईंच्या रूपाने पवार कुटुंबीय पहिल्यांदाच आमच्या घरी आले, हा आनंदाचा क्षण आहे.
- डॉ. सुजय विखे पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT