Sujay Vikhe Patil Pudhari
अहिल्यानगर

Sujay Vikhe District Bank: जिल्हा बँक चालवताना भावनेपेक्षा गणिताला महत्त्व; सुजय विखे यांचा स्पष्ट संदेश

शेतकरी, कारखानदार आणि सहकारी सोसायट्यांच्या हितासाठी निर्णय; पाच वर्षांनंतर बँकेचा अभिमान वाटेल, असा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँक चालवताना भावनेपेक्षा गणिताला महत्त्व असेल. कारखान्यांकडून मिळणारे व्याजदेखील बँक चालवण्यासाठी महत्त्वाचे आहे. याचा विचार करून पाचही वर्षे बँक चांगली चालेल, शेतकऱ्यांसाठी चालेल आणि कारखानदारांच्या हितासाठी अन् सहकारी सोसायट्या पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन निर्णय होतील, असा विश्वास जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी होत आहे. त्यासाठी बँकेत डॉ. विखे बँकेत आले तेव्हा माध्यमांशी बोलत होते. बँक चालविताना निर्णय तेच होतील जे शेतकऱ्यांच्या हिताचे असतील. एखादा निर्णयाबाबत रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अडचण आली, तरी शेतकऱ्यांसाठी नियम बदलविण्याचा प्रयत्न असेल. मात्र, त्यावर कोणी तक्रार केली तर त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न असेल, त्याला थांबवू शकत नाही, अशा शब्दात डॉ. विखे यांनी ‘चौकशी’ची भाषा करणाऱ्या खा. नीलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.

पाच वर्षांनंतर सर्वांना अभिमानच वाटेल!

बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनाच पुढे सक्षमपणे चालवल्या, तरी तो फार मोठा आधार ठरेल. कर्जमाफीतून बँकेला आलेले पैसे किंवा अन्य धोरणांबाबत योग्य निर्णय होतील. लोकप्रिय निर्णय घेऊन ‘बातमी’ बनवण्याची घाई न करता ‘ती घाई आणि बातमी ही शेवटची व्हायला नको,’ अशी टिप्पणी करत ‘पाच वर्षांनंतर सर्वांना अभिमान वाटेल, अशीच बँक चालेल,’ असा विश्वास व्यक्त केला.

ऊसदराबाबत समन्वय व्हावा

शेतकरी संघटना अन् कारखानदार यांच्यात समन्वय झाला पाहिजे. शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि कारखानेही टिकले पाहिजे. दुष्काळामुळे पुढचा हंगाम होणार नाही. तरी कारखान्यांकडील कर्ज थांबणार नाही, व्याज थांबणार नाही, याचाही विचार करावा लागणार आहे. साखर उतारा आणि साखरेचे दर असेच टिकून राहिले, तर संघटनांच्या मागणीप्रमाणे सन्मानजनक ऊसदराची अपेक्षा पूर्ण करता येईल, असा विश्वासही डॉ. विखे यांनी दिला. खासगीच्या तुलनेत सहकारी कारखानदारी अडचणीत असल्याचेही ते म्हणाले.

आज बँकेची पहिली बैठक

संचालक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी होणार आहे. बँकेचे नाव ‘अहिल्यानगर’ करायचे आहे, त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनात बँक चालवली जाईल. सोसायट्या ऊर्जितावस्थेत आणणे, ‘जुने-नवे’ प्रकरणातील विलंब दूर करणे इत्यादी विषयांवर निर्णय होतील, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT