ऊसदरावरून संघर्ष! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा Pudhari
अहिल्यानगर

Swabhimani sugarcane price dispute: ऊसदरावरून संघर्ष! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

कमी दर दिल्यास 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूक बंद; मागण्या 3300 प्रति टन दर व शेतकऱ्यांचे हक्क

पुढारी वृत्तसेवा

भातकुडगाव फाटा : जिल्ह्यातील काही साखर कारखाने तुलनेने चांगला दर देत आहेत, तर काही कारखाने अगदी कमी दर देत असल्याने येणाऱ्या काळात ऊस दरावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत असून, योग्य दर न दिल्यास आवाज उठविणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.(Latest Pune News)

राज्यातील 2025-26 ऊस गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारने सर्व साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. मागील वर्षी खत, बियाणे, मजुरी आणि मशागत यांसारख्या खर्चात मोठी वाढ झाली असली, तरी जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांनी फक्त 2700-3200 दर दिला. काही कारखान्यांनी पहिला हप्ता दिला असला, तरी दुसरा हप्ता अद्याप शिल्लक आहे.

जिल्ह्यातील काही साखर कारखाने (प्रवरा 3200, गणेश 3000, संगमनेर 3200) तुलनेने चांगला दर देत आहेत. गंगामाई, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर, पैठण व वरखेड यांसारख्या कारखान्यांनी फक्त 2700-2850 दर दिला आहे. साखरेचा सध्याचा दर 42 प्रतिकिलो असून, केंद्र व राज्य सरकारने 20 टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी दिल्यामुळे कारखानदारांना नफा होत आहे. तरीही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मत आहे.

शासनाची मदत अद्याप मिळाली नसल्यामुळे शेवगाव व नेवासा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त हतबल झाले असताना उसालाही योग्य दर न मिळाल्यास आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मागील वर्षाचा 200 फरक दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, चालू वर्षी ऊसाचा दर किमान 3300 प्रति टन जाहीर करावा, कारखान्यांकडून रस चोरी व रिकव्हरीचे गैरव्यवहार ताबडतोब थांबवावेत, शेतकऱ्यांची काटामारी थांबवावी, आदी मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या आहेत.

चालू वर्षाचा ऊस दर अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत कोणीही ऊसतोडणी किंवा वाहतूक करू नये, असे आवाहन संघटनेने केले असून, ऊसदर जाहीर न झाल्यास व शेतकऱ्यांवर अन्याय झाला, तर 1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, शेवगाव तालुकाध्यक्ष अशोक भोसले, मच्छिंद्र आरले, प्रशांत भराट, अमोल देवढे, दादा पाचरणे, हरिभाऊ कबाडी, नारायण पायघन, विकास साबळे, अंबादास भागवत, नानासाहेब कातकडे, मच्छिंद्र डाके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT