नगर: जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी 12 लाख मे.टन गाळपाचा टप्पा पार केला आहे. अनेक कारखान्यांनी पहिल्या पंधरवाड्याचे पेमेंटही बँकेत वर्ग केले आहे. मात्र, साखरेचे दर, उपपदार्थाचे उत्पन्न याचा विचार करताना पहिली उचल ही 3500 रुपये मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने उचलून धरली होती.
मात्र, कारखानदारांनी सरासरी 3000 रुपये पहिली उचल देऊन या मागणीकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे बहुतांशी कारखानदारांनी तीन हजार रुपयांची पहिली उचल दिल्याने ऊसदर ठरविण्यासाठी साखर सम्राटांची छुपी ‘युती’ यावर्षीही कायम असल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात 22 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केलेला आहे. साखर उतारा सरासरी 11 च्या आतमध्ये लागताना दिसतो आहे. यावरून शेतकरी संघटनेने कारखानदारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यासाठी न्यायीक लढाही उभारण्याची तयारी सुरू आहे. मात्र, असे असताना शेतकऱ्यांनाही यावर्षी 3500 रुपये भाव मिळेल, अशी अपेक्षा होती.
मात्र पहिला पंधरवाड्याचे पेमेंट वर्ग करताना, अगस्ती, अशोक, लोकनेते मारुतीराव घुले, पद्मश्री विठ्ठलराव विखे पा., कर्मवीर शंकरराव काळे , मुळा सहकारी, सहकार महर्षि थोरात, वृद्धेश्वर, गंगामाई या कारखान्यांनी सरासरी 3000 रुपये प्रतिटन प्रमाणे पहिल्या पंधरवाड्याचे पेमेंट बँकेत वर्ग केले आहे. तर, प्रसाद शुगर, श्रीगणेश, नागवडे, कोल्हे, केदारेश्वर, अंबालिका आदी कारखान्यांची पहिली उचलही लवकरच बँकेत वर्ग केली जाणार असल्याचे समजते आहे. मात्र, किती वर्ग केली जाणार, याविषयी शेतकऱ्यांना उत्कंठा आहे.
बहुतांशी कारखान्यांनी तीन हजारांची पहिली उचल देणे हे कारखानदारांनी संगनमत केल्याचे दर्शविणारे आहे. साखर उतारा कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. कारखानदारांच्या या लुटीचा पर्दाफाश करण्यासाठी युवा शेतकऱ्यांनी समोर येण्याची आवश्यकता आहे. किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.डॉ. अजित नवले, शेतकरी नेते
शिवसेनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह 18 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेल्या मुक्क्काम आंदोलनात 3550 रुपये पहिली उचल मिळावी तसेच आर.एस.एफ आणि एफआरपीमध्ये होणारी चोरीकडे आयुक्त डॉ. संजय कोलते यांचे लक्ष वेधले होते. लवकर कारखानदारांसमवेत बैठक लावून यातून तोडगा काढणार असल्याचे डॉ. कोलते यांनी सांगितले आहे.अभिजित पोटे, शिवसेना शेतकरी नेते
आम्ही 3550 रुपये पहिली उचल मागितली असताना तीन हजारांवर बोळवण केली आहे. यामुळे सगळे कारखानदार एकत्र येवून दर ठरवितात, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. लोकशाही मार्गाने घामाचे दाम घेतल्याशिवाय शेतकरी संघटना शांत बसणार नाही.अनिल औताडे, जल्हाध्यक्ष शेतकरी संघटना