वाळकी : नगर तालुक्यातील अकोळनेर येथे संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरीनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या टोळीने महिला भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. वेळीच ही बाब लक्षात आल्यावर तेथील नागरिकांनी चोरट्यांच्या अठराजणांच्या टोळीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अकोळनेर येथील संत तुकाराम गाथा पारायणाची काल (दि. 23) सांगता झाली. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. दुपारी 12 वाजता सांगता झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीत अनेक महिलांच्या गळ्यांतील सोन्याच्या दागिन्यांच्या चोर्या होऊ लागल्या . काही वेळात चोर्यांच्या या घटना निदर्शनास आल्या. त्यामुळे स्वयंसेवक सतर्क झाले. त्यांनी चोरट्यांची शोध मोहीम सुरू केली.
काही वेळातच तीन ते चार महिला आणि काही पुरुषांना पकडण्यात आले. बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. नागरिकांनी पकडलेल्या महिला व पुरुषांकडे कसून तपासणी केल्यावर काही महिलांकडे चोरलेले दागिने सापडले. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात आला. या चोरट्यांच्या टोळीत एकूण अठरा जणांचा समावेश असल्याचे समोर आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चोरट्यांच्या टोळीमध्ये चिरंजीव रमेश शिंदे (वय 18), प्रभाकर गंगाधर पवार (वय 26), आण्णा शिवाजी शिंदे (वय 28), गयाबाई शंकर शिंदे (वय 56), अंजली मंगेश शिंदे (वय 35), शांताबाई सुनील जाधव (वय 62), लक्ष्मी माधव पवार (वय 32), रोहिणी किसन पवार (वय 25), प्रियांका अमोल शिंदे (वय 30), गयाबाई राजेश पवार (वय 55), अनिता अर्जुन शिंदे (वय 32), शीला शंकर गायकवाड (वय 45), सुनीता अनिल शिंदे (वय 42), सरिता विलास शिंदे (वय 52), हिराबाई रमेश शिंदे (वय 30), रुपाली प्रभाकर पवार (वय 25), सपना कृष्णा शिंदे (वय 28), संगीता अण्णा शिंदे (वय 25, सर्व रा. गोंदी, ता.अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे.
याबाबत कांचन सुधीर जाधव (वय 23, रा.अकोळनेर, ता.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दागिने चोरीला गेल्याबाबत चार महिलांनी पोलिसांना जबाब दिले असून, त्यातील तीन महिलांचे 1 लाख 35 हजारांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.