Ahilyanagar ST Smart Card Charges Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar ST Smart Card Charges: एसटी स्मार्ट कार्डसाठी जादा वसुली?; 220 रुपये घेऊन 199 ची पावती

अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची तक्रार; आगारात रांगा आणि प्रशासनाची मौन भूमिका

पुढारी वृत्तसेवा

नगर: एसटी महामंडळाने सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी स्मार्ट कार्ड (एनसीएमसी) बंधनकारक केले आहे. त्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी महामंडळाच्या तारकपूरसह जिल्हाभरातील आगारांमध्ये वयोवृद्ध नागरिकांची गर्दी उसळली आहे. मात्र, या ठिकाणी गोरगरीब वयोवृद्ध नागरिकांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. 220 रुपये घेऊन हाती 199 रुपयांची पावती दिली जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. म्हणजेच प्रत्येकाकडून अधिकचे 21 रुपये उकळले जात आहेत.

गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी 75 वर्ष पूर्ण वा अधिक वयाच्या नागरिकांसाठी एसटीचा प्रवास मोफत तर महिलांना तिकिट दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 65 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी 50 टक्के सवलत लागू केलेली आहे. शासनाची पन्नास टक्के वा शंभर टक्के सवलत घेण्यासाठी प्रवाशांना आधार कार्डची जवळ बाळगणे महामंडळाने सक्तीचे केले होते. काही प्रवाशी बनावट आधार कार्डचा वापर करून सवलतीचा लाभ घेत असल्याचे एसटी महामंडळाच्या नजरेस आले. त्यामुळे आता महामंडळाने सवलत घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, 65 वर्षांवरील वयोवृध्द व्यक्ती तसेच विद्यार्थी, दिव्यांग व्यक्तींना एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड (एनसीएमसी) बंधनकारक केले आहे. स्मार्ट कार्ड जवळ असले तरच एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सवलती मिळणार आहे.

त्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्याची व्यवस्था महामंडळाने त्या त्या आगारात उपलब्ध केलेली आहे. सवलत घेणाऱ्या व्यक्तींना कार्डसाठी दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी महामंडळाच्या आगारांत गेल्या काही दिवसांपासून गोरगरीब ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांच्या रांगा लागत आहेत. उन्हाचे चटके सहन करीत वयोवृध्द नागरिक नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तारकपूर बसस्थानक गाठत आहेत.

या कार्डसाठी प्रत्येक व्यक्तीकडून 220 रुपये आकारले जात आहेत. मात्र, वयोवृध्द नागरिकांच्या हाती 199 रुपयांची पावती टेकवली जात आहे. प्रत्येक व्यक्तींकडून 21 रुपयांची लूट महामंडळ करीत असल्याचे दिसत आहे. गोरगरिब आणि वयोवृध्द व्यक्ती मुकाटपणे 220 रुपये देत आले आहेत. कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर काही दिवसांनी कार्ड उपलब्ध होणार आहे. कार्ड घेतेवेळी आणखी जादा पैसे द्यावे लागतील का असा प्रश्न गोरगरिब जनता विचारात आहे.

एसटी अधिकाऱ्यांची गुपचिळी

स्मार्ट कार्डसाठी कमी रक्कम आकारणे अपेक्षित असताना दोनशे रुपये आकारले जात आहे. महागाईच्या काळात गोरगरिब वयोवृद्ध नागरिकांसाठी ही रक्कम मोठी आहे. अशा परिस्थितीत देखील 220 रुपये घेऊन पावती 199 रुपयांची दिली जात आहे. याबाबत तारकपूर आगार प्रमुख चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांकडून 220 रुपये उकळणे सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT