मामाच्या गावाला आली, तरुणाची सोशल मीडियावर रस्ता लूट Pudhari
अहिल्यानगर

Social Media Robbery: मामाच्या गावाला आली, तरुणाची सोशल मीडियावर रस्ता लूट

श्रीगोंदा तालुक्यात फेसबुक व व्हॉट्सॲपवर ओळख करून तरुणाला भेटताना लुटले; गुन्हे शाखेने तिघांना अटक केली

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: व्हॉटस्‌‍ॲपवर तिचा ‌‘हाय‌’ आला. ओळखीच्या खाणाखुणा सांगितल्यानंतर तरुणाला तिच्यावर विश्वास बसला. इतकंच काय तर तिने स्वत:चा फोटोही शेअर केला. ‌‘मामाच्या गावाला आले, भेटयाला ये, असे सांगणाऱ्या तरुणीला भेटण्यासाठी तरुण निघाला खरा, पण पूर्वनियोजीत कटानुसार तिच्या पाच साथीदारांनी रस्त्यातच अडवत त्याला लुटले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासात तिघांना गजाआड करत ‌‘सोशल‌’ची लूट उघड केली. (Latest Ahilyanagar News)

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर ओळख करून लुटीच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातही सोशल मीडियाचा वापर रस्ता लुटीसाठी होत असल्याचा प्रकार प्रथमच आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चार व पुणे जिल्ह्यातील एक असे पाच मित्र आर्थिक अडचणींने त्रस्त होते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही तरी केले पाहिजे या विचारात असतानाच श्रीगोंद्यातील एकाला फेसबुकवर सोन्याच्या ऐवजाचा फोटो दिसला. सोने खरे की खोटे याची खातरजमा करत असतानाच फोटो पोस्ट करणाऱ्याशी संपर्क साधला.

तरुणाच्या मोबाईलवर एका तरुणीचा मेसेज आला. दोघांत चॅटींग सुरू झाले. तिने ओळखीच्या खाणाखुणा सांगितल्याने त्याचा तिच्यावर विश्वास बसला. तिने नाव, गाव सांगून स्वत:चा फोटोही शेअर केला. ‌‘मामाच्या गावाला आले, भेटयाला ये, अशी गळ घातली. तरुणाला विश्वास बसल्याने तोही मित्राला सोबत घेत लागलीच तिला भेटायला निघाला. श्रीगोंदा शहरापासून काही अंतर जाताच पाठीमागून आलेल्या चारचाकीने त्याची गाडी अडविली. धमकी देत गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, मोबाईल असा ऐवज हिसकावत पोबारा केला.

रस्ता लुटीची तक्रार तरुणाने श्रीगोंदा पोलिसांत दाखल करताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लुटारुंचा शोध सुरू केला. तपासात श्रीगोंदा शहरातील तरुणाचा गुन्ह्यात सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे तो अधिक काळ खोटे बोलू शकला नाही. इतर मित्रांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली देतानाच मैत्रिणीने मदत केल्याचे सांगितले. त्याच्या माहितीनुसार पोलिसांनी तिघांना अटक केली.

जरा जपूनच!

सोशल मिडियाच्या जमान्यात अनोळखी व्यक्तीशी जरा जपून वागले पाहिजे. लुटीसाठीही आता सोशल मिडियाचा वापर होत असल्याचा प्रकार गावखेड्यातही पोहचल्याचे यातून समोर आले. रस्ता लुटीसाठी नवा फंडा वापरला जात असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी सर्तकता बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT