Smart Anganwadi Kitchen Set Pudhari
अहिल्यानगर

Smart Anganwadi Kitchen Set: अंगणवाड्यांना स्मार्ट किचन सेटसाठी १ कोटींचा निधी मंजूर

जिल्हा वार्षिक योजनेतून तरतूद; ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचे स्वयंपाकघर होणार आधुनिक

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचा स्मार्ट अंगणवाडी म्हणून विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून अंगणवाडी केंद्रांना किचन सेट पुरविण्याची योजना महिला व बालकल्याण विभागाने प्रस्तावित केली असून, लवकर त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या ३१ जानेवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील उपयोजना 'क' मधील मुद्दा क्रमांक चारनुसार अंगणवाडी केंद्रांतील स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण करण्याची तरतूद आहे.

याच आधारावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना किचन सेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, अहिल्यानगर यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे या योजनेसाठी एक कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आनंद भंडारी यांनी या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती समजली. मात्र, या निधीतून जिल्ह्यातील नेमक्या किती अंगणवाड्यांना किचन सेट मिळणार, एका संचाची किंमत किती असेल, त्यात कोणते साहित्य दिसेल, याबाबतची अंगणवाडी सेविकांमध्येही उत्सुकता आहे.

अंगणवाड्यांचा स्मार्ट अंगणवाडी म्हणून विकास होत आहे. यात आता किचन सेटचाही पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी एक कोटींची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. मात्र निविदा प्रक्रिया बाकी असल्याने किती अंगणवाड्यांना हे सेट दिले जातील, हे निश्चित सांगता येणार नाही.
संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT