श्रीगोंदा: बहुचर्चित आढळगाव परिसरातील राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मशीनऐवजी कामगारांच्या मदतीने असल्याचे पाहायला मिळत आहे.
आढळगाव ते जामखेड या राष्ट्रीय महामार्ग 548 डीचे काम गेल्या दहा महिन्यांपासून चर्चेत आहे. आढळगाव येथील कार्यकर्ते सुभान तांबोळी, सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी रस्त्याच्या कामासाठी तीनवेळा उपोषण केले. खासदार नीलेश लंके यांनी त्यांच्या स्टाईलने संबंधित यंत्रणेला समज दिल्याने हे काम सुरू झाले. आढळगाव परिसरात एक किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पूर्ण रस्ता उकरण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. गेल्या दीड महिन्यापासून या रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू करण्यात आले आहे. कामगारांच्या मदतीने हा रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने या कामाच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात एका बाजूचे फक्त आठशे मीटर रस्त्याचे काम झाले आहे. बाकी उर्वरित रस्त्यावर खडी टाकून ठेवण्यात आली आहे.
सरपंच शिवप्रसाद उबाळे म्हणाले, या राष्ट्रीय महामार्गा लगत तुकाई अन लक्ष्मीमाता मंदिर आहे. या दोन मंदिरासाठी आम्ही बाजूला जागा उपलब्ध करुन देण्यास तयार आहोत. मात्र, संबंधित अधिकारी या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. ज्यावेळी या रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण झाले. त्यावेळी संबंधितांना ही मंदिरे दिसली नाहीत का? तीन वर्षात निधीची का तरतूद करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आहेत. ही दोन मंदिरे बांधून द्यावीत, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.
या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करणारे सुभान तांबोळी म्हणाले, अनेकवेळा उपोषण, आंदोलने केल्यानंतर काम सुरू झाले. काम संथ गतीने सुरू असल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व संबंधित काम करणारी एजन्सी यांचा ग्रामस्थांना त्रास देण्याचा उद्देश असल्याचे दिसून येते.
केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून दोन जिल्हे, दोन राज्ये जोडण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे जाळे तयार झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. अनेक दिवसापासून आढळगाव परिसरातील राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम बंद होते. आंदोलनानंतर काम सुरू झाले. मात्रस राष्ट्रीय महामार्गाचे काम मशीनऐवजी कामगारांच्या मदतीने सुरू आहे. कामगारांच्या मदतीने करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्न आहे. अशा पद्धतीने सुरू असलेले काम हे देशातील पहिले उदाहरण असेल, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
बसस्थानक उभारणे महत्वाचे
आढळगाव बसस्थानक परिसरात दोन्ही बाजूंनी गटाराचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले बसस्थानक पाडून टाकण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बसस्थानक उभारण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.