पुणतांबाः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा येथे बसविण्यात येणारा अश्वारूढ पुतळा व शिवस्मारकाच्या मुख्य वेशीजवळील नियोजित जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्वभूमीवर पुतळा व शिवस्मारक स्टेशन रस्त्यावरील भाजी मंडईच्या जागेत बसविण्यात येणार आहे, असा एकमुखी ठराव पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आला. दरम्यान, या निर्णयाचे शिवभक्तांसह ग्रामस्थांनी समाधान केले आहे.
सरपंच स्वाती पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेस ग्रामस्थांची उपस्थिती नगण्य होती. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, अभिवादन करण्यात आले. (Latest Ahilyanagar News)
यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, रेल्वे स्टेशन रस्त्यावरील भाजी मंडईची जागा ग्रामपंचायतीच्या नावावर झाल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषद अधिकार्यांशी चर्चा झाली आहे.
छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पुणतांबेत बसविण्यासाठी पाच वर्षांपूर्वी निर्णय झाला. पुतळा आणला, मात्र केवळ जागेअभावी हा प्रश्न भिजत न ठेवता, गटबाजी व राजकारण न आणता एकत्र येऊन, जागेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शिवसेनेचे सुहास वहाडणे व कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांनी केली.
या चर्चेत प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे, माजी सरपंच मुरलीधर थोरात, उप सरपंच अॅड. निकिता जाधव, सुनील कुलट, चंद्रकांत वाटेकर, बाळासाहेब भोरकडे आदींनी सहभाग घेतला. यावेळी कामगार तलाठी मयूर औटी, ग्रामपंचायतीचे सदस्य भूषण वाघ, अनिल नळे, रामचंद्र पवार, श्याम धनवटे, अक्षय सोमवंशी, कांचन पेटकर, वंदना वाटेकर, रवींद्र थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात पुणतांबा हे एकमेव उदाहरण!
लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व शिवस्मारकासाठी तब्बल 35 लाख रुपये जमा झाल्याचे जिल्ह्यात पुणतांबा हे एकमेव उदाहरण आहे. शिवस्मारकाच्या नियोजित जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने पुतळा बसविण्यास विलंब होत आहे, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दत्ता धनवटे म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा बसवावा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुणतांब्याच्या धार्मिक क्षेत्राला तसेच विकासाचे मोठे योगदान असून छत्रपतींच्या नियोजित जागेचा न्यायप्रविष्ट असलेल्या प्रश्नाचा निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने जाहीर झाल्यानंतर या जागेवर अहिल्यादेवींचा पूर्ण आकृती पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी कमिटी स्थापन करावी तसेच यावेळी सुहास वहाडणे यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी 51 हजार रुपयाची वर्गणी देण्याचे जाहीर केले.