Scam Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Sispe Scam: सिस्पे घोटाळा उघड; 278 कोटींची मालमत्ता निष्पन्न, 12 जण अटकेत

2000 बँक खाती गोठवली; एमपीआयडीअंतर्गत कारवाईमुळे गुंतवणूकदारांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर: राज्यात बहुचर्चित सिस्पे, इनफिनाईट बिकन व अन्य कंपन्यांच्या आर्थिक अपहराच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 12 जणांना गजाआड करत 278 कोटींची मालमत्ता निष्पन्न केली. त्यातील 115 कोटींची मालमत्तेचा एमपीआयडीतंर्गत प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. उर्वरित मालमत्तांचाही प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तपासात कंपनी, संचालक, एजंटांची सुमारे 2000 खाते गोठविण्यात आली आहेत.

जादा परताव्याचे आमिष दाखवून सिस्पे, इनफिनाईट व अन्य तत्सम कंपन्यांमध्ये अहिल्यानगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, पुणे जिल्ह्यात गुंतवूणक करण्यास भाग पाडले. सिस्पे घोटाळ्याचे श्रीगोंदा, सुपा व तोफखाना पोलिस ठाण्यांत चार गुन्हे दाखल आहेत. या घोटाळ्यात गुंतवणूकदारांच्या जबाबानुसार साधारण 20 कोटींची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चार गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात चार संचालक व आठ एजंट अशा 12 जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी परदेशात फरार झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. तपासी अधिकाऱ्यांनी फरार आरोपींच्याही नाकेबंदी केली असून, लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत.

या गुन्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 115 कोटींची मालमत्ता पोलिसांनी निष्पन्न केली. 2 हजार बँक खाते गोठविण्यात आले असून त्या 113 कोटीची रक्कम आहे. 115 कोटींचा एमपीआयडीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. पुढील तपासात पुन्हा 155 कोटींची मालमत्ता निष्पन्न केली असून, त्याचा एमपीआयडीनुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाकडून कार्यवाही झाल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, एबीपी (ॲथोराईझ बिझनेस पाटर्नर) 6030 खातेधारकांनी ठेवीदारांच्या पैशातून गैरलाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची खाते गोठविण्यासाठी विविध बँकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात 113 कोटींची रक्कम फ्रीज

गुन्ह्यातील संशयित आरोपी कंपनीचे संचालक, एजंट, गैरलाभार्थ्यांच्या विविध बँकेतील सुमारे 2000 खाते गोठविले केली असून, त्यातील सुमारे 113 कोटींची रोख रक्कम फ्रीज करण्यात आली आहे. एक कोटी 55 लाखांची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 14 कोटी 93 लाख 86 हजारांचा एमआयडीअंतर्गत प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यावर लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

पुन्हा 155 कोटींची मालमत्ता निष्पन्न

नव्याने पोलिस तपासात पुन्हा सुमारे 155 कोटींची मालमत्ता निष्पन्न झाली आहे. सिस्पे संचालक, एजंट व गैरलाभार्थी असलेल्या संशयित आरोपींनी नागरिकांच्या पैशातून विविध शहरामध्ये जमिनी, प्लॉट, गाळे घेतल्याचे निष्पन्न झाले. तसेच, नव्याने संशयित आरोपींची विविध बँक खात्यात असलेली आठ कोटींची रोकड फ्रीज करण्यात आली. त्यामुळे साधारण 163 कोटींच्या मालमत्तेचा पुरवणी एमपीआयडी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत

सिस्पे घोटाळ्यात राज्यात आठ गुन्हे दाखल असून, सुरूवातीला केवळ 14 कोटींचा अपहार झाल्याचे नमूद होते. पोलिसांनी गुंतवणूकदारांचे घेतलेल्या जबाबानुसार घोटाळ्याचा आकडा 20 कोटींवर गेला आहे. तो आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क करून जबाब नोंदवावा, असे आवाहन तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी केले आहे. एमपीआयडीनुसार शासनाकडे प्रस्ताव सादर होत असल्याने गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला

गुन्ह्यातील दोन मुख्य संशयित आरोपी दुबईत फरार झाले असून, त्यांनी तेथील नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे प्रयत्न हाणून पाडले. त्यांच्या अटकेसाठी कायदेशीर प्रक्रिया करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 12 आरोपींपैकी आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात पाच आरोपींविरोधात श्रीगोंदा न्यायालयात, तर तोफखाना पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात तीन आरोपींविरोधात अहिल्यानगर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT