जामखेड: गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या महापुराने तालुक्यातील सीना नदीकाठच्या 15 गावांना मोठा फटका बसला आहे. जवळा, आगी, पिंपरखेड, फक्राबाद, चौंडी आदी गावांमध्ये हाहाकार उडवला आहे.
सीना नदी काठच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून उसाचे पीक व जमिनीसह वाहून गेले आहे. सीना नदीवरील पुराच्या पाण्याने सर्वच बंधाऱ्यांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Latest Ahilyanagar News)
ह्या पुराच्या पाण्याचा फटका पुण्यलोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमी असलेल्या या ऐतिहासिक चोंडी गावातील अहिल्यादेवी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, परिसरातील शेती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीचे पात्र 100 ते 300 मीटरपर्यंत बाजूच्या शेतांतून पाणी वाहत असून, पाणीपातळी 10 मीटर उंचावली आहे. स्थानिकांनी मदत मागितली असून, प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले आहे.
सीना नदीच्या महापुराने जामखेड तालुक्यातील चोंडी, कवडगाव, गिरवली, देवकरवस्ती, आगी आणि जवळा या गावांनाही धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसह जमीनदेखील वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरडगाव येथे खैरी नदीच्या पुरामुळे दौंडाची वाडी रस्त्यावर अडकलेल्या 7 जणांची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुटका केली.