

कर्जत: कर्जत शहरातील उपकोषागार कार्यालय पावसाच्या पाण्यात अक्षरशः असून, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. छतातून सतत गळणाऱ्या पाण्यामुळे कार्यालयातील प्रत्येक खोलीत बादल्या ठेवून कर्मचारी दिवसभर काम करीत आहेत.
कामाऐवजी पाणी बाहेर काढणे आणि कागदपत्रे वाचवणे हेच त्यांचे काम झाले आहे. टेबलवर कामाऐवजी शासनाचे स्टॅम्प पेपर व इतर साहित्य सुरक्षित ठेवण्याची व सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (Latest Ahilyanagar News)
उपकोषागार अधिकारी मुकुंद शिंदे यांनी सांगितले की, कर्जतमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. उपकोषागार कार्यालयाची संपूर्ण इमारत गळत आहे. सकाळी कार्यालयामध्ये आल्यावर पाहिले असता मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र पाणी साचले होते. यामध्ये प्रामुख्याने स्ट्राँग रूममध्ये पावसामुळे शासकीय स्टॅम्प भिजण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्टॅम्प ठेवलेले स्ट्राँग रूम सकाळी पूर्णपणे पाण्यात होते.
संगणकासह इतर साहित्याचे आधीच नुकसान झाले असून, विजेचा प्रवाह उतरल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. अशा वातावरणात आम्ही काम कसे करायचे? असा संताप व्यक्त करत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाघचौरे यांना अनेकदा संपर्क केला. मात्र, त्यांनी दूरध्वनीही उचलला नाही व अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता
वास्तविक पाहता तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे काम हे कार्यालय करते. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचाही समावेश आहे. जर उपकोषागार कार्यालयाने ठरवले, तर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पुढील काही महिने विनावेतन काम करावे लागेल. कारण सर्व साहित्य पावसामुळे खराब झाल्यास काही दिवस काम बंद राहण्याची वेळ या कार्यालयावर येणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.