श्रीरामपूर: प्रसूतीदरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक होत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी रुग्णालय अतिदक्षता विभागात तसेच डॉ. मैड हॉस्पिटलबाहेर वाहनांची तोडफोड केली. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून शवविच्छेदन करून मृतदेह असलेली रुग्णवाहिका शनिवारी नातेवाइकांनी थेट शहर पोलिस ठाण्यासमोर उभी करत रास्ता रोको आंदोलन करताना डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नॉदर्न ब्रँच येथील बुशरा वसीम सय्यद (वय २२) या महिलेला प्रसूतीसाठी जिजामाता चौकातील डॉ. मैड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया (सिझर) करून तिची प्रसूती झाली. प्रसुतीनंतर बुशराची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे तिला तातडीने पुढील उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूची माहिती समजताच ५० ते ६० जणांचा संतप्त जमाव साखर कामगार रुग्णालयात जमला. जमावाने आयसीयूमध्ये तोडफोड केली. जमावातील काहींनी डॉ. मैड हॉस्पिटलकडे धाव घेत बाहेर उभी असलेली इनोव्हा कार आणि दुचाकीची तोडफोड केली. या प्रकारामुळे दोन्ही रुग्णालयांतील कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच डॉ. विनायक मोरगे, डॉ. समीर बडाख, डॉ. विनोद बागुल, डॉ. प्रदीप जयस्वाल, डॉ. गणेश बैरागी यांच्यासह शहरातील अनेक डॉक्टरांनी रुग्णालयात धाव घेतली. दुसरीकडे, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यातही नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधिक्षक जयदत्त भवर यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. धमकावून चाकू लावण्यात आल्याचा आरोप डॉ. संचित मैड यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून शवविच्छेन केलेला मृतदेह असलेली रुग्णवाहिका नातेवाइकांनी थेट शहर पोलिस ठाण्यासमोर उभी करत रास्ता रोको केला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून डॉक्टरविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. प्रसूतीनंतर अवघ्या अर्ध्या तासात बुशराची प्रकृती खालावली होती. यावेळी डॉक्टरांना उपचारासाठी वारंवार पाचारण करण्यात आले; मात्र ते सुमारे अर्धा तास न आल्यामुळेच बुशराचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप करत सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात
मात्र, ‘मेडिकल कमिटी'च्या अंतिम अहवालानंतरच रितसर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या तोंडी उत्तराने नातेवाइकांचे समाधान झाले नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांनी नातेवाइकांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेत मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेतला. दरम्यान, यासंदर्भात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.