श्रीरामपूरच्या प्रभाग रचनेत अनेकांना धक्का Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur ward structure: श्रीरामपूरच्या प्रभाग रचनेत अनेकांना धक्का

करण ससाणे, रवी पाटील, रईस शेखच्या वार्डाची तोडफोड

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: 89 हजार 282 मतदार असलेल्या श्रीरामपूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी 17 प्रभागातून 34 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. नव्या प्रभाग रचनेत अनेक भागाची तोडफोड करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक रवी पाटील, रईस शेख यांच्या प्रभागाची तोडफोड झाल्याने त्यांना नव्या प्रभागाची शोधाशोध करावी लागणार आहे.

शामलिंग शिंदे, जयश्री शेळके, राजेश अलग व प्रणिती चव्हाण यांचे प्रभाग तुटले असले तरी त्यांना फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र समोर आले. माजी नगरसेवक सौ. गवारे व प्रकाश ढोकणे यांना वार्डाची तोडफोड डोकेदुखी ठरणार आहे. प्रभागाची तोडफोड झाल्याने माजी नगरसेवक चंद्रकला डोळस यांनाही नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. (Latest Ahilyanagar News)

प्रभागाची तोडफोड झाल्याने माजी नगरसेवक रवी पाटील व भारती कांबळे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. चुकीच्या पध्दतीने तोडफोड करून अन्याय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रभाग सात मधील मुस्लिमबहुल भागात मोठी तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीमुळे संजय फंड व निलोफर शेख यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यावर नव्या प्रभाग रचनेत मोठा अन्याय झाल्याची भावना समर्थकांमध्ये आहे. ससाणे यांच्यासह मिरा रोटे यांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. माजी नगरसेविका तरन्नूम जहागीरदार व दिलीप नागरे, मुजफ्फर शेख यांनी नवीन प्रभाग रचनेबाबत नाराजी व्यक्त केली.

प्रभागाची तोडफोड झाली असली तरी माजी नगरसेवक अंजुम शेख, कलीम शेख, समीना शेख व ताराचंद रणदिवे यांना फारसा फरक पडणार नसल्याचा दावा केला जातो. प्रभाग रचनेत फारसा बदल न झाल्याने राजेंद्र पवार, अक्सा पटेल यांना कोणतेही धावपळ करावी लागणार नसल्याचे सांगितले जाते. 13 व 14 वार्डात नव्या रचनेत मोठे बदल असून प्रभाग 14 मधील बहुतांश मतदार 13 मध्ये समाविष्ट झाल्यामुळे दीपक चव्हाण व वैशाली चव्हाण यांना प्रभाग बदलावा लागेल, असे दिसते.

प्रभाग 15 चीही तोडफोड झाली असून श्रीनिवास बिहाणी व आशा रासकर यांचे मतदार पूर्णपणे बदलले गेले आहेत. त्यामुळे त्यांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. प्रभाग सोळा मधील बहुतांश मतदार प्रभाग 17 मध्ये गेले असून त्यांचा प्रभाग निम्म्याहून अधिक तुटला गेला आहे. त्यामुळे मनोज लबडे व केतन खोरे यांना पुन्हा प्रभागातील नवीन मतदार जोडावे लागणार आहे. प्रभाग 17 मध्ये अशीष धनवटे, रवी पाटील, भारती कांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

ठराविक नगरसेवकांसाठी श्रीरामपूर नगर परिषदेची प्रभाग रचना संपूर्णपणे बदलून तोडफोड करण्यात आली आहे. मुस्लिम मतांची चुकीची विभागणी करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. प्रभाग रचनाही चुकीची व अन्यायकारक झाली असून हरकती नोंदवून जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहे. तिथेही न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू.
- करण ससाणे, माजी उपनगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT