Shrirampur Accident Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Accident: तिचे प्रसंगावधान मृत्यूला पराजित करते तेव्हा...भरधाव ट्रकने उडवले आणि स्कूटीवरून उडूनही तिने हिमतीने वाचवला जीव

अपघातानंतर ट्रकचालकाचीच तरुणीवर दादागिरी

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७, बेलापूर रोडवर बोरावके यांच्या घराकडे वळत असताना स्कुटीवरून येणाऱ्या तरुणीला वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. अक्षरशः उडविलेच.

मात्र हिमतीने व प्रसंगावधानामुळे तरुणीने स्कुटीवरून हवेत उडाल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली येण्यापासून स्वतःचा बचाव केला... ट्रक थांबला.

मग उठून तरुणीने स्वतः चालत जाऊन स्कुटी उभी केली. तिच्या या हिमतीला पाहणाऱ्या सर्वांनीच दाद दिली. मात्र या तरुणीची मदत करण्याऐवजी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचालकानेच तरुणीवरच दादागिरी केल्याचे समजते.

बेलापूर रोडवरून प्रतिक बोरावके यांच्या घराकडे एक वाळ की माती घेऊन जाणारा ट्रक जोराने जात होता. त्या वेळी रस्त्याने इतर वाहने येत-जात होती.

ट्रक बेलापूर रोडवरून येऊन उजव्या बाजूला बोरावके यांच्या घराकडे वळत असताना समोरून स्कुटीवरून आलेल्या मुलीला ट्रकने समोरून जोरात धडक दिली. तेव्हा स्कुटी ट्रकला धडकून पडली आणि स्कुटीवरील तरुणी हवेत उंच उडाली.

ती हवेत उडाली पण बरोबर ट्रकच्या समोरच. त्या वेळी ट्रक पूर्णपणे थांबला नव्हता. त्यामुळे हवेत उडालेली तरुणी जमिनीवर पडणार आणि ट्रकखाली सापडणार, असे हे दृश्य पाहणाऱ्या कुणालाही वाटले असणार.

पण तरुणीने दाखविलेली हिंमत आणि प्रसंगावधान तिचा या मृत्यूच्या दाढेतून बचाव करण्यास कारणीभूत ठरले. तरुणीने हवेत उडाल्यानंतर खाली पडता पडताच ट्रकच्या पुढच्या अँगलला (बंपर) धरले. ती अँगलला धरून लटकली म्हणूनच केवळ ट्रकखाली गेली नाही आणि तिचा जीव वाचला.

घटनास्थळी असलेल्या अनेकांनी धावत जाऊन तरुणीला मदत केली. त्या वेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्या वेळी भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकानेच तरुणीवर दादागिरी करण्यास सुरुवात केली.

परंतु तेथील नागरिक तरुणीच्या मदतीला आल्यामुळे चालकाने काढता पाय घेतला. हा ट्रक वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील वाळू लिलावातील असून त्याला नंबर प्लेटही नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी अशा नंबरप्लेट नसलेल्या वाळू डंपर वा ट्रकच्या चालकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT