श्रीरामपूरः काही महिन्यांपूर्वी नगर पालिकेचे लेखापाल व निवृत्त अभियंता हाणामारीचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा, पालिकेतील लेखा विभागातील एका महिला अधिकार्याची दुसर्या महिला अधिकार्याशी खडेजंग हुज्जत झाल्याची घटना समोर आली आहे.
हे प्रकरण एवढ्यावरचं न थांबता, थेट हमरीतुमरीसह शिवीगाळपर्यंत पोहोचल्याची चर्चा पालिका कर्मचारी वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, निलंबन काळातील बील अदा न केल्याचा राग मनात धरून ही हुज्जत घातल्याची चर्चा सुरु आहे.(Latest Ahilyanagar News)
गेल्या अठवड्यात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे श्रीरामपूर दौर्यावर आले होते. पालिकेतील सर्व अधिकारी जिल्हा अधिकार्यांसमवेत क्षेत्रभेटीसाठी गेले होते. नेमकं याचवेळी लेखा विभागात हा गैरप्रकार घडल्याचे समजते. दुसर्या एका विभागातील सहाय्यक पदावरील महिला अधिकार्याचे काही वर्षांपूर्वी निलंबित झाले होते.
त्याकाळातील काही बिले त्यांनी लेखाविभागात सादर केले होते, मात्र लेखाविभागाने हे बिले अदा करण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने सदर अधिकारी महिलेने लेखा विभागातील एका जबाबदार अधिकारी महिलेशी वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन, प्रकरण थेट हमरीतुमरीसह वैयक्तीक शिवीगाळपर्यंत्त पोहचले.
विशेष असे की, सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद घालणे, हाताखालच्या कर्मचार्यांना वेठीस धरणे, नागरिकांना अरेरावी करणे अशा अनेक तक्रारी या महिला अधिकार्याविरोधात पालिका उप मुख्याधिकार्यांकडे आल्या आहेत, असे समजते.
शिवाय एका सामाजिक संघटनेने दाखल केलेल्या एका तक्रारीची दखल घेत, पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकार्यांनी या महिला अधिकार्याची चौकशी सुरू केली आहे. सरळसेवेतील हे पद बढतीद्वारे गैरमार्गाने मिळविल्याचा दावा या तक्रारीत केला आहे.
या चौकशी समितीमध्ये लेखाविभागातील दोन महिला अधिकारी काही महिन्यांपूर्वी तत्कालिन लेखापाल व सेवा निवृत्त अभियंता यांच्यात जोरदार खडाजंगी होऊन, प्रकरण थेट खुर्च्या एकमेकांच्या डोक्यात टाकण्यापर्यंत पोहोचले होते. तत्कालिन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी मध्यस्थी करुन, प्रकरण सामोपचाराने मिटविले होते. गेल्या काही वर्षांपासून पालिकेत प्रशासकीय राज असल्याने अधिकार्यांवर कुणाचाही वचक राहिला नसल्यानेच असे गैरप्रकार घडत असावेत, असा संतप्त सूर उमटत आहे.