तलवारी, कोयते नाचवत श्रीरामपुरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur violence: तलवारी, कोयते नाचवत श्रीरामपुरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

शहरातील भगतसिंग चौक, पोलिस मदत केंद्राजवळची घटना

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर : शहरातील भगतसिंग चौक, पोलिस मदत केंद्राजवळच 6 ते 7 जणांच्या टोळक्याने तलवारी व कोयते नाचवत तब्बल 9 वाहनांच्या काचा फोडल्या. आरडाओरडा व शिवीगाळ करत ‘बाहेर या. एकेकाला कापून टाकतो.. येथे फक्त आमचंच राज्य चालेल’ असे ओरडत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या चाकूहल्ल्याच्या प्रकरणाशी या घटनेचा संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. रामदास जाधव, संकेत संदीप पाटील, समीर नजीर पठाण, तौसिफ रशीदखान पठाण, गणेश रामदास जाधव, सलमान इब्राहीम शेख, राजू सय्यद यांच्यासह अनेकांनी हा प्रकार पाहिल्याचे सांगितले. यातील मनोज रामदास जाधव सांगितले की, पहाटे 03.30 च्या सुमारास आमच्या गल्लीमध्ये जोरजोरात शिवीगाळ करण्याचा आवाज आला.

मी खिडकीतून पाहिले असता 6 ते 7 अनोळखी इसम हातात तलवारी, कोयते घेऊन, शिवीगाळ करत ‘बाहेर या एकेकाला कापून टाकतो, येथे आमचेच राज चालेल’ असे जोरजोरात ओरडत होते. त्या वेळी सदर इसमांनी त्यांच्या हातातील कोयत्यांनी बाहेर उभ्या असलेल्या आमच्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यांच्या हातात हत्यारे असल्याने मी बाहेर आलो नाही. ते गेल्यावर आम्ही गल्लीतील सर्वजण बाहेर आलो.

मनोज जाधव यांची दोन वाहने, संकेत संदीप पाटील यांच्या कारसह तीन वाहने, समीर नजीर पठाण यांची अ‍ॅपे रिक्षा, तौसिफ रशीद खान पठाण यांचे वाहन, सलमान इब्राहीम शेख यांची अ‍ॅपे रिक्षा, राजू जाकीर सय्यद यांची अ‍ॅपे रिक्षा, गणेश रामदास जाधव यांच्या पाणीपुरीची हातगाडी अशा वाहनांचे नुकसान टोळक्याने केले.

दोन दिवसांपूर्वी पालिकेजवळ झालेल्या चाकू हल्ल्यातील आरोपीचे घर भगतसिंग चौकात, घासगल्लीत असल्यामुळे अशी दहशत पसरविण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक संभाजी शिवाजी खरात यांनी फिर्याद दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT