श्रीरामपूर : महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश मुंबईतून दिले गेले तरी ते डावलून श्रीरामपुरात महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांनी स्वबळावर लढण्याचे जवळपास निश्चित केले असल्याची माहिती हाती आली आहे. स्थानिक नेत्यांच्या या निर्णयामुळे महायुतीत राज्यातील पहिला मिठाचा खडा श्रीरामपुरात पडल्याचे स्पष्ट होवू पाहत आहे.(Latest Ahilyanagar News)
सोमवारपासून नगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. त्यापूर्वी उमेदवार निश्चितीसाठी स्थानिक नेत्यांकडून चाचपणी सुरू आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने त्या ‘तोलामोला’चा उमेदवार देण्यासाठी व्यूहनिती आखली जात आहे. महायुतीतील शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदावर दावा केला होता. प्रसंगी स्वबळाची भाषाही केली गेली. शिंदे सेनेने विधानसभेचा दाखला देत नगराध्यक्ष पदावर दावा केल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी जाहीर करतानाच स्वबळाची तयारी असल्याचे सांगितले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक आणि अशोक कानडे यांच्यासाठी आग्रह धरला गेला. शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रकाश चित्ते, सागर बेग यांच्या नावासाठी आग्रह धरण्यात आला. तिन्ही पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी दावा सांगितला गेल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला.
भाजप सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले प्रकाश चित्ते यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे. त्यानुसार चित्ते हे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यातच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी अचानक प्रकाश चित्ते यांच्या घरी भेट दिल्याने चर्चेत भर घातली आहे.
माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनीही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार असल्याचे दोन दिवसापूर्वी जाहीर केले. मावळत्या नगराध्यक्ष नात्याने या पदावर राष्ट्रवादीचाच दावा असल्याचे सांगत आदिक यांनी स्वत:ला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करून टाकले. माजी आमदार लहू कानडे यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे बंधू अशोक कानडे यांच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कानडे की आदिक अशी चर्चा सुरू असतानाच त्यात आदिक यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
भाजपाकडे नगराध्यक्ष पदासाठी पाहिजे तसा चेहरा मिळत नसल्यामुळे अनेक दिवस चाचपणी सुरू होती. श्रीरामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचाच असेल या दृष्टीने तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, स्वाती चव्हाण यासह काही नावे चर्चेत होती. मात्र शुक्रवारी वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत श्रीरामपूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून श्रीनिवास बिहाणी यांच्या नावाला पसंती दर्शविण्यात आल्याचे समजते. भाजपकडून श्रीनिवास बिहाणी हे नगराध्यक्ष पदाची उमेदवार असतील असे जवळपास निश्चित झाले मानले जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उबाठा शिवसेना एकत्रितपणे नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहिली तरच महायुतीचा पराभव शक्य असल्याची जाण मविआच्या स्थानिक नेत्यांना आहे. उबाठा सेनेकडून अशोक थोरे यांचे पुढे करण्यात आले असले तरी ठाकरेंच्या आदेशानंतर संघर्षला पूर्णविराम मिळणार असल्याने काँग्रेस निश्चिंत आहे. काँग्रेसकडून माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे किंवा जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष करण ससाणे या मायलेकांपैंकी एकाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडी नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार देणार असल्याचे निश्चित असून महायुतीच्या तीन घटकपक्षाचे तीन उमेदवार असणार असल्याने श्रीरामपूरात चौरंगी सामना होण्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.