Shrirampur Love Marriage Dispute Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Love Marriage Dispute: प्रेमविवाहानंतर श्रीरामपूरात हायव्होल्टेज ड्रामा; कारच्या बोनेटवर बसून आईचा थरारक पाठलाग

न्यायालयाबाहेर वाद विकोपाला; सज्ञान जोडप्याला अडविण्याचा प्रयत्न, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: मुलीने केलेला प्रेमविवाह मुलीच्या आईला मान्य नव्हता. त्यामुळे एका स्विफ्ट कारमधून जात असलेल्या मुला-मुलीची गाडी मुलीच्या आईने अडविली. मात्र चालकाने गाडी चालविल्याने मुलीच्या आईला जावयाच्या स्विफ्ट कारच्या बोनेटवर बसून थरारक प्रवास सहन करावा लागला.

मुलीची आई चालत्या गाडीत बोनेटवर बसून काचेवर चप्पल मारत जोरजोरात ओरडत होती. हा जीवघेणा थरार बराच वेळ सुरू होता. मुलीच्या नातेवाईकांनी कारच्या काचा फोडल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र संबंधितांनी यावर तोडगा काढत प्रकरण तेथेच शांत केले. मुला-मुलींनी पळून जावून लग्न केले. त्यादरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी तालुका पोलिसात दिली होती.

मात्र मुलीने एका मुलासोबत प्रेमविवाह केलेला होता. या तक्रारीबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित मुलगा आणि मुलगी श्रीरामपूर न्यायालयात आले होते. त्या ठिकाणी मुलीच्या आईचे आणि समोरच्या लोकांचे वाद झाले. गाडीमध्ये मुलगा आणि मुलगी बसलेली होती. मुलीने नातेवाईकांसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर आईचा राग अनावर झाल्याने आई चक्क गाडीच्या बोनेटवर बसली. मात्र चालकाने तशीच कोर्ट परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सुमारे सात ते आठ मिनिटे तशीच गाडी चालवली. संबंधित आई असलेली महिला जोरजोरात ओरडून गाडीच्या काचेवर चप्पल मारीत होती. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाडी आल्यावर काही अपहरणाचा प्रकार आहे का? असे समजून लोकांनी गाडी अडवली.

त्यावेळी नातेवाईकही मागून मोटरसायकलवर आले. नातेवाईकांनी रागाच्या भरात गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी या भागात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. अधिक चौकशी केली असता मुलगा आणि मुलीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला आहे. दोघेही सज्ञान असल्याचे लक्षात आले.

त्यामुळे काहीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असे काही प्रतिष्ठित दोन्ही बाजूकडील संबंधित व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे यांनी एकत्र बसून दोघेही सज्ञान असल्यामुळे त्यांना अडवत येणार नाही, असे म्हणत आपापसात चर्चा करत हा वाद तेथेच मिटवल्याने याप्रकरणी पोलिसांत काहीही दाखल करण्यात आलेले नाही. वादावर शेवटी पडदा टाकण्यात आला. त्यानंतर मुलीचे नातेवाईक आणि मुलगा व मुलगी निघून गेले. सदर मुलगी श्रीरामपूर तालुक्यातील आणि मुलगा राहुरी तालुक्यातील असल्याचे समजते. थरारक दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT