श्रीरामपूरः एकीकडे पावसाळा सुरू असताना, दुसरीकडे शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पसरलेल्या घाणीमुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
पालिकेने शहरातील कचरा भरण्याचा ठेका ज्या कंपनीला दिला, त्याची मुदत संपल्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात काम सुरु आहे, परंतू संबंधित ठेकेदाराने कामात कुचराई करण्यास सुरुवात केली आहे. कचरा भरण्यासाठी येणार्या घंटा गाड्या बर्याच भागामध्ये गायब झाल्या आहेत. (Latest Ahilyanagar News)
दोन दिवसाआड कचरा गाड्या येतात. कचर्या गाड्यावर वाजणारे भोंगे व गाणी आता बंद झाली आहेत. याबाबत कचरा उचलणार्या कर्मचार्यांना विचारले असता, गाड्या बंद झाल्या आहेत, बिघडल्या आहेत. यामुळे आता ट्रॅक्टरमधून कचरा भरण्याचे काम सुरू आहे,’ असे सांगण्यात आले. यापूर्वी कचरा गाड्या भल्या सकाळी गाणे वाजवित आल्यानंतर लोक घरातील कचरा त्या गाड्यांमध्ये देत होते, परंतू गेल्या काही दिवसांपासून गाड्या नादुरुस्त झाल्याचे कारण देत, कचर्या उचलण्याचे टाळले जात आहे.
काही भागांमध्ये दोन- तीन दिवस कचरा गाड्या येतच नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, परंतू या गंभीर बाबीकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. शहरामध्ये कचर्यासह मोकाट कुत्री व डुकर यांच्या संख्येत लक्षणी वाढ झाली आहे.
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सर्व भागात कायम आहे. त्यांचा बंदोबस्त पालिका करीत नाही. मुले व महिलांना कुत्रे चावतात, परंतू त्यांची नसबंदी किंवा त्यांना पकडण्यासंदर्भात पालिका कारवाई करीत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
पालिका मुख्याधिकार्यांनी यंत्रणेला शिस्त लावावी!
प्रशासक राजवट असल्यामुळे सर्व विभागांचा कारभार मुख्याधिकारी यांच्या अधिपत्याखाली चालतो, परंतू त्यांचे कनिष्ठ अधिकारी त्यांना योग्य सहकार्य करीत नसल्याचे बोलले जाते. आरोग्य खात्यामध्ये कर्मचार्यांमध्ये आपसात ताळमेळ नसल्याने शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्याधिकारी यांचा प्रभाव कर्मचार्यांवर नसल्यामुळे काहीजण मनमानी करतात. यामुळे मुख्याधिकार्यांनी आता यासंदर्भात कडक पावले उचलावीत. शहरातील आरोग्य यंत्रणेला शिस्त लावावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.