

राहुरी: राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील माजी सरपंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोर यांच्यावर शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.
गेल्या काही वर्षांपासून रवींद्र मोरे हे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शेतकर्यांच्या प्रश्नांवरील अनोख्या आंदोलनामुळे ते सर्वत्र चर्चेत असायचे. (Latest Ahilyanagar News)
मंगळवारी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकत मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र मोरे यांना शिवसेना पक्षाच्या शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असणार. शिवसेना सचिव संजय मोरे, सुभाष जुंदरे, बाळासाहेब जाधव, सचिन म्हसे,किशोर वराळे, विजय तोडमल, सतिश पवार, प्रमोद पवार, आनंद वने, रविकिरण ढुस, धनंजय लहारे, सचिन गडगूळे, राहुल करपे, संदिप शिरसाठ, निलेश लांबे, सचिन पवळे, रामभाऊ जगताप यावेळी उपस्थित होते.