श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथनगर ग्रामपंचायतीचे सदस्याला श्रीरामपूर-बेलापूर रोडवरील सद्गुरु मंगल कार्यालय येथे लोखंडी गजाने आणि फायटरने हल्ला करत भरदिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सरपंचपतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भैरवनाथनगर येथे राजकीय वादातून ग्रामपंचायतीचे सदस्य वसंत पाराजी देवकर (वय 50) हे 16 मार्च 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. लग्नाचे जेवण उरकून ते हात धुण्यासाठी बाजूला गेले असता, तेथे अक्षय विजय फरगडे, अभिजीत जालीदंर शिंदे, गणेश तांबे, बबल्या उर्फ अजय फरगडे आणि संकेत विजय फरगडे यांनी त्यांना गाठले.
यावेळी अक्षय फरगडे याने देवकर यांना विचारले की, ‘तू माझे चुलते प्रविण बाबुराव फरगडे आणि दिलीप फरगडे यांच्या ग्रामपंचायत कामकाजात का अडथळा आणतोस? मला प्रविण फरगडेने तुझा कार्यक्रम करण्यासाठीच पाठवले आहे‘. असे म्हणून त्याने हातातील लोखंडी गजाने देवकर यांच्या कपाळावर जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या हल्यावेळी इतर काही जणांनी वसंत देवकर यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संकेत फरगडे याने त्याच्या हातातील फायटरने देवकर यांच्या पाठीवर वार केले, तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण सुरू असतानाच ‘जर पुन्हा आमच्या चुलत्यांच्या नादी लागला, तर तुझा संतोष देशमुख करून टाकू‘ अशी जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. लग्नातील उपस्थित लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
त्यानंतर गावातील गोविंद कांदे यांनी जखमी अवस्थेत असलेल्या देवकर यांना उपचारासाठी तत्काळ साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात वसंत पाराजी देवकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सरपंच पती प्रविण बाबुराव फरगडे याच्यासह अक्षय विजय फरगडे, अभिजीत जालीदंर शिंदे, गणेश तांबे, बबल्या उर्फ अजय फरगडे, संकेत विजय फरगडे आणि मुख्य सूत्रधार प्रविण फरगडे यांच्यासह अन्य 2 ते 3 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.