नगर: श्रीरामपूर शहरातील बनावट विदेशी दारू निर्मिती करणार्या घरगुती कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत बनावट दारू निर्मितीसाठी आवश्यक साहित्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मनोज भाऊसाहेब पवार, शुभम भाऊसाहेब पवार, हिराबाई भाऊसाहेब पवार, बाळू सोमनाथ फुलारे या तिघांना ताब्यात घेतले असून, राहुल बाळू फुलारे हा फरार झाला आहे. (Ahilyanagar News Update)
श्रीरामपूरमध्ये बनावट दारूची निर्मिती केली जात असल्याची खबर प्रशासनाला मिळाली होती, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक प्रमोद सोनोने, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक प्रविणकुमार तेली यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा विभागाचे निरीक्षक व कर्मचारी तसेच अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर यांचे पथकाने संयुक्त मोहिम राबवून केली.
छाप्यामध्ये इंपेरिअल ब्ल्यु व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, मॅकडॉल नं.19 व्हिस्की या नामांकित ब्रॅडच्या बनावट विदेशी मद्याच्या 153 बाटल्या आणि 487 बनावट बूचे, रिकाम्या बाटल्या व 160 लिटर शुद्ध मद्यार्काचा अवैध साठा असा 79 हजार 970 रुपयांचे बनावट विदेशी मद्य व बनावट विदेशी मद्य बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन निरीक्षक अ.द.देशमाने करीत आहे.