श्रीरामपूर : ऊस तोड सुरु असताना, अचानक बछड्यासह डरकाळी फोडीत बिबट्या समोर आल्यामुळे ऊस तोड मुजुरांची चांगलीच धावपळ उडाली. बेलापूर बु. येथील सातभाई वस्तीवरील शेतात हा थरार घडला.
सातभाई परिसरात ॲड. बाळासाहेब व प्रशांत बाळासाहेब वाबळे यांच्या शेतात ऊस तोडणी प्रगतीपथावर सुरु आहे. ऊस तोड सुरु असताना अचानक ऊसातून बछड्यासह बिबट्या समोर येवून, रुबाबात उभा राहिला. आरडा-ओरड ऐकून आजुबाजुच्या नागरिकांनी वाबळे यांच्या शेताकडे धाव घेतली. तोपर्यंत बिबट्याने शेजारील शेतात धूम ठोकली.
सातभाई वस्ती येथे शाळा आहे. लहान मुले या शाळेत जातात. हा भाग वस्त्यांचा आहे. अवती- भोवती ऊसासह अन्य पिके उभी आहेत. यामुळे बिबाट्याला आडोसा मिळत आहे. जवळच प्रवरा नदी असल्यामुळे पाणी उपलब्ध होते. यामुळे या भागात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. बछड्यासह मादी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे या परिसरात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून, बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी केली जात आहे.