Kidnapping News Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Agriculture Officer Kidnapping: बोगस खत कारवाईचा सूड! कृषी अधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण; श्रीरामपूर तालुक्यात खळबळ

गळनिंब येथील कृषी सेवा केंद्रावर कारवाईनंतर चारचाकीत कोंबून अधिकाऱ्याला कोल्हारला नेल्याची चर्चा; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: येथील पंचायत समितीच्या कृषी गुणनियंत्रण अधिकाऱ्याने एका कृषी सेवा केंद्रात बोगस खत विक्री प्रकरणी कारवाई केली. या कारवाईचा राग मनात धरून सदर कृषी सेवा केंद्र चालकाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट चारचाकी वाहनातून संबधीत अधिकाऱ्याचे अपहरण केले. त्या अधिकाऱ्यास कोल्हार येथे सोडून दिले. याबाबतची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

श्रीरामपूर पंचायत समितीचे एक कृषी गुणनियंत्रण अधिकारी गळनिंब शिवारातील एका कृषी सेवा केंद्रावर तपासणीसाठी गेले होते. यावेळी दुकानात आणि खतांच्या साठ्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्यांनी नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.

गळनिंब येथील कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संबंधित अधिकारी पुढील तपासणीसाठी बेलापूर येथील एका कृषी सेवा केंद्रावर पोहोचले. मात्र, आधीच्या कारवाईचा राग मनात धरून संबंधित गळनिंब येथील कृषी सेवा केंद्र चालकाने काही जणांना सोबत घेऊन बेलापूर गाठले. तिथे त्या अधिकाऱ्याला थेट चारचाकी वाहनात दमदाटी करून बळजबरीने कोंबून अपहरण केले आणि कोल्हार गळनिंब शिवाराच्या दिशेने नेण्यात आले.

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बेलापूर येथील कृषी केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली होती. अधिकाऱ्याला बळजबरीने कोल्हार येथे नेल्यानंतर तिथे दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांना सुखरूप सोडून देण्यात आले, अशी चर्चा सध्या बेलापूर गावात सुरू आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहेत.

श्रीरामपूर आणि बेलापूर परिसरात सध्या खुलेआम बोगस खतांचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच कृषी विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले होते. या धाडसत्रामुळे बोगस खत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. परंतु, शासकीय कर्तव्य बजावत असताना जर अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होत असेल, तर शेतकऱ्यांचे रक्षण कसे होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT