Share Market Fraud  (File Photo)
अहिल्यानगर

Shrigonda News: श्रीगोंद्यात शेअर मार्केट घोटाळा प्रकरण तापले

भाजपचे राजेंद्र म्हस्के यांचे सोमवारपासून उपोषण

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा : श्रीगोंदा, पारनेर, तसेच राज्यातील विविध भागांत शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ करणार्‍या नवनाथ आवताडे आणि त्याचे सहकारी संचालक व एजंट यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, आरोपींना अटक करून त्यांच्या पारपत्रांची जप्ती करावी, या मागणीसाठी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी येत्या सोमवार (दि. 14) पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सिस्पे, इन्फनाईट बिकॉन आदी कंपन्यांच्या माध्यमातून तालुक्यात आणि परिसरात कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे. या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. मात्र, कालांतराने कोणालाही ना परतावा मिळाला, ना मूळ रक्कम.

म्हस्के यांनी पुढे सांगितले की, हा आर्थिक घोटाळा 2015पासून सुरू असून, पारनेर व श्रीगोंदा भागात नवनाथ आवताडेने नवख्याप्रमाणे प्रवेश करून अनेकांना फसवले. एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार होऊनही प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले? यामागे कोणाचा आशीर्वाद होता का? हे तपासणे गरजेचे आहे. त्यांनी हा आरोपही केला की, गुन्हा दाखल व्हावा, ही योजनाही आवताडे याचीच असू शकते. कारण अनेक गुंतवणूकदार तक्रार करायला पुढे येत नव्हते. त्यांना परतावा मिळेल, अशी आश्वासने देऊन वेळ काढली जात होती. मात्र, या सर्व टाळाटाळीनंतर आता अनेकांचे लाखो रुपये अडकले आहेत. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी तातडीने कारवाई करावी. आवताडे हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला आणि इतर संचालकांना त्वरित अटक करणे अत्यावश्यक आहे, असे म्हस्के यांनी ठामपणे सांगितले. या मागणीसाठी सोमवारी (दि.14) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्यात येणार असून, फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT