भाजप आणि राष्ट्रवादीत नावांची जोरदार चर्चा Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda municipal election: श्रीगोंद्यात खरी लढत महायुतीतच! नगराध्यक्षपदासाठी दोन गट आमनेसामने

पाचपुते विरुद्ध नागवडे-जगताप गटात चुरस; भाजप आणि राष्ट्रवादीत नावांची जोरदार चर्चा

पुढारी वृत्तसेवा

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात श्रीगोंदा नगरपरिषदेचे राजकीय पटलावर वेगळे स्थान आहे. पुढील काही महिन्यांत होणार असलेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले असल्याने अनेकांना नगराध्यक्षपद खुणवू पाहत आहे. सन 2016नंतर पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे..(Latest Ahilyanagar News)

या निवडणुकीत माजी आ. राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार यांचा एक गट आणि विद्यमान आ. विक्रम पाचपुते यांच्या गटात ही निवडणूक होणार आहे. अर्थात महायुतीचे घटक आमने-सामने ठाकणार हे निश्चित आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी समाधान व्यक्त केले. भाजपकडून नानासाहेब कोंथिबिरे, सुनीता खेतमाळीस, योगिता बापू गोरे, अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस यांची नावे चर्चेत आली आहेत. असे जरी असले, तरी भाजपकडून ऐनवेळी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‌‘राष्ट्रवादी‌’कडून मनोहर पोटे, प्रशांत गोरे, शुभांगी पोटे, सतीश मखरे, कांतिलाल कोथिंबिरे, एम. डी. शिंदे यांच्या नावाची चर्चा असली, तरी शुभांगी पोटे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

मात्र, गेल्या पाच वर्षांत श्रीगोंदा नगरपरिषदेत जे राजकीय महाभारत घडले त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटणार आहेत. एकनाथ शिंदे गटाचे नेते व माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही असले, तरी पोटे यांच्या नावाला होणारा विरोध लक्षात घेऊन शुभांगी पोटे यांच्या नावावर एकमत होऊ शकते. अर्थात शुभांगी पोटे किंवा मनोहर पोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त इच्छुकांनी जोरदार तयारी असल्याचे दाखवून दिले असले, तरी ऐनवेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी कुणाच्या पदरात पडते हे त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.

सन 2019प्रमाणे या निवडणुकीतही भाजपची परिस्थिती मजबूत दिसत आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपने गड आला पण सिंह गेला हे अनुभवले आहे. त्यामुळे भाजपचे नेते नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत मौन बाळगून आहेत. आ. विक्रम पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असल्याने त्यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसोबतच नगरसेवक पदाची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय स्वतः आ. विक्रम पाचपुते घेणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT