Shrigonda Municipal Council Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Loni Protest: लोणी आंदोलनाने श्रीगोंद्याच्या मनमानी कारभाराला दिला थेट इशारा!

दोन चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर निघालेला मोर्चा ठरला अवैध धंदे, प्रशासनातील हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाविरोधातील जनआक्रोश

पुढारी वृत्तसेवा

अमोल बी. गव्हाणे

श्रीगोंदा: लोणी व्यंकनाथ येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोर्चात सगळ्याच नेत्यांसह, कार्यकर्त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंदे आणि मनमानी कारभाराच्या मुद्द्यावर प्रशासकीय यंत्रणांना किंबहुना या यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांना चांगलेच लक्ष्य केल्याचे पहायला मिळाले.

गेल्या दीड वर्षापासून तालुक्याच्या राजकीय पटलावर कमालीची शांतता होती. विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत नेते कमालीचे शांत होते. तालुक्यात विरोधक आहेत की नाही असाही गंमतीने प्रश्न उपस्थित केला जात होता. मागील आठवड्यात लोणी व्यंकनाथ येथील दोन चिमुकल्यांचा शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत. परिणामी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गावकऱ्यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आंदोलन केले. या आंदोलनाला वेगळे वळण लागत गेले. आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांच्या समर्थनार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी आ. राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राजेंद्र म्हस्के, अनिल ठवाळ यांच्यासह इतर नेत्यांनी केले.

गेल्या दोन वर्षांत महसूल, पंचायत समिती; विशेषतः श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्याच्या कारभाराबाबत लोकांच्या अनेक तक्रारी होत्या. तत्कालीन पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी होत्या. मात्र, एका बड्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने तक्रारी असूनही त्यांना जवळपास दोन वर्ष काम करता आले. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखली गेली का हा संशोधनाचा विषय ठरेल. त्यांच्यानंतर हजर झालेले पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हजर होताच चांगल्या कारवाया केल्या. पण लोणी व्यंकनाथ येथील घटनेत त्यांच्या भूमिकेविषयी लोकांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली. कालच्या आंदोलनात अनेकांनी शनी चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत आपली मते मांडली. आता पोलिस निरीक्षक ठेंगे शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडतात की सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे कानाडोळा करतात हे काही दिवसात समजेलच.

कालचा मोर्चा आणि त्या मोर्चादरम्यान मांडण्यात आलेल्या भूमिका या फक्त लोणी प्रकरणापुरत्या मर्यादित नव्हत्या. राजरोस सुरू असलेली गुटखाविक्री, काष्टी बाजारातून जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाकडून कशा पद्घतीने खंडणी गोळा केली जाते एवढेच नाही तर लोणी व्यंकनाथ, घोड नदी परिसरातून सुरू असलेल्या माती उपशात कुणाचे हात आहेत याची पोलखोल करण्यात आली. हे धंदे कुणाचे हे शोधून काढणे पोलिसांसाठी अवघड नाही. तसेच कारवाई करणेही अवघड नाही. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून एक प्रकारे यंत्रणा त्यांना पाठबळ देत असल्याचे दिसते. काल झालेल्या मोर्चात आंदोलकांच्या भावना लक्षात घेतल्या, तर कुणी मनमानी कारभार करणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असाच सूर होता.

आता तरी अधिकारी अलर्ट होतील

तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा हा लोणी व्यंकनाथ येथील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी असला, तरी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात अधिक होता. या आंदोलनातून अधिकारी वर्ग बोध घेईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई हीच खरी श्रद्धांजली

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा त्या दोन चिमुकल्यांचा जीवावर बेतला. रुग्णवाहिका दिली असती तर त्या दोन्ही मुली वाचल्या असत्या. त्या कुटुंबांवर ही वेळ आली नसती. दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी खासदार डॉ. निलेश लंके, आ. हेमंत ओगले यांनी शासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई हीच त्या चिमुकल्यांना श्रद्धांजली ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT