Liquor  Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Illegal Liquor Seizure: श्रीगोंद्यात गोव्यातून येणाऱ्या अवैध मद्याचा १.८५ कोटींचा साठा जप्त

निमगाव खलू टोलनाक्यावर कंटेनरवर छापा; स्थानिक यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने निमगाव खलू शिवारात छापा टाकत गोवा राज्यातून अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह 1 हजार पाचशे मद्याचे बॉक्स असा एक कोटी 85 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, गोवा राज्यातून मद्याची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

महाराष्ट्र राज्यात चोरटया मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार काल(दि. 12) रात्री नगर-दौंड महामार्गावरील निमगाव खलु येथील टोल नाक्यावर पथकाने सापळा लावला. रात्री 10 च्या सुमारास दौंडहून नगरच्या दिशेने चाललेला अशोक लेलँड कंपनीचा सहा चाकी कंटेनेर (क्रमांक एच आर .47.एफ .3490) अडवून तपासणी केली असता, गोवा राज्यात निर्मिती करण्यात आलेल्या विदेशी मद्याचे एक हजार पाचशे बॉक्स आढळून आले. पथकाने कंटेनरसह 1 कोटी 85 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत वाहन चालक प्रेमकुमार जनकधारी सिंग यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपअधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत नवनाथ घोडके, सर्वश्री राजाराम सोनवणे, दिलीप नागरे, विकास गायकवाड, बाबू देवकर, ओंकार हराळे, बी.एस.घुगे, पारधे, अविनाश कांबळे यांनी सहभाग घेतला. विजय ढवळे यांच्या फिर्यादीवरून वरील गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण करीत आहेत.

स्थानिक पथकाने कारवाई का नाही केली?

मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यात येऊन मोठी कारवाई केली. इथल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आतापर्यंत एकदाही इतकी मोठी कारवाई का शक्य झाली नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

बेकायदा मद्याचे रॅकेट उघड करा

भरारी पथकाने गोवा राज्यातून वाहतूक करणाऱ्या कंटेनर वर कारवाई करून मद्याचा साठा जप्त केला. हा कंटेनर गोवा येथून नेमका कुठे जाणार होता, तो कोणाकडे खाली होणार होता, याचा मुख्य सूत्रधार कोण याची उत्तरे अद्याप अनुत्तरित असून, संबंधित यंत्रणेस त्याच्या खोलाशी जाऊन बेकायदा मद्याचे रॅकेट उघड करावे लागणार आहे.

पाचशे किलोमीटरमध्ये तपासणी नाही

दरम्यान, गोवा राज्यातून बेकायदा दारू वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा ते श्रीगोंद्यापर्यंत अनेक ठिकाणी तपासणी केंद्र आहेत, त्या ठिकाणी या असल्या कंटेनरबाबत शंका का उपस्थित झाली नाही. का ही दारू वाहतूक संबंधित यंत्रणेस हाताशी धरून तर सुरू नव्हती ना असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT