श्रीगोंदा: शहरातील महात्मा फुले उद्यानासमोर एका महिला व्यावसायिकेवर लोखंडी गजाने हल्ला केल्याच्या निषेधार्थ शहरात मंगळवारी (दि. 24) कडकडीत बंद पाळण्यात आला. सावकारी कर्जाच्या जाळ्यात गुंतवून जीवघेणा त्रास देणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
महिलेवर हल्ला करणारे आरोपी नगरपरिषदेच्या वाचनालयाच्या इमारतीत राहतात. परिसरात गुंडागर्दी करतात. मात्र, प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे त्यांची दादागिरी वाढत चालली आहे. ही गुंडगिरी पोलिस मोडून काढणार नसतील, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला. या वेळी पोलिस निरीक्षक किरणकुमार शिंदे व मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 24) श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. शहरातील बहुतांश दुकाने, आस्थापने बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही लोक व्याजाने पैसे देतात अन् अव्वाच्या सव्वा व्याज घेतात. सावकारी कर्जाचा फास गळ्याला आवळून इज्जत घेतात याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.
पोलिस निरीक्षक किरणकुमार शिंदे म्हणाले की, महिलेला मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत म्हणाल्या की, दि. 7 व 8 एप्रिलला पोलिस बंदोबस्त घेऊन वाचनालय इमारतीतील अतिक्रमणे काढण्यात येतील.
कुणाची आम्ही गय करणार नाही. या वेळी उपनगराध्यक्षा अलका अनभुले, अरविंद कापसे, प्रा. बाळासाहेब बळे, नगरसेविका मीरा शिंदे, धनराज कोथिंबिरे, प्रशांत गोरे, संतोष इथापे, शहाजी खेतमाळीस, संतोष खेतमाळीस, सागर बोरुडे, नानासाहेब शिंदे, अमोल दंडनाईक, आदेश शेंडगे यांची भाषणे झाली.