विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमले नगर; दिंड्या शहरात दाखल Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar: विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमले नगर; दिंड्या शहरात दाखल

त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी हरिनामाचा जप करीत छत्रपती संभाजीनगर महामार्गाने रविवारी अहिल्यानगर शहरात दाखल झाली.

पुढारी वृत्तसेवा

नगर: त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी हरिनामाचा जप करीत छत्रपती संभाजीनगर महामार्गाने रविवारी अहिल्यानगर शहरात दाखल झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पालखी दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

ही दिंडी मंगलगेटमार्गे कापडबाजार, ख्रिस्तगल्लीमार्गे मार्केट यार्ड परिसरातील हमाल पंचायतीत मुक्कामी थांबली आहे. दरम्यान शहरात दाखल झालेल्या विविध दिंड्यांमुळे अवघे अहिल्यानगर विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमून गेले आहे. (Latest Ahilyanagar News)

महापालिकेच्या वतीने वारकर्‍यांसाठी व्यवस्था करण्यात आली असून, सोमवारी सकाळी संत निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा होणार आहे. यानिमित्ताने कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या पालखी दिंडीबरोबरच इतरही दिंड्या शहरात मुक्कामी असल्यामुळे अहिल्यानगर शहर विठठलमय झाले आहे.

जवळपास 35 ते 40 हजार वारकरी सहभागी झालेली संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी डोंगरगणहून रविवारी सायंकाळी पाच वाजेचच्या सुमारास अहिल्यानगर शहरात दाखल झाली. या दिंडीचे स्वागत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे आदींनी स्वागत केले.

पोलिस बंदोबस्तात ही दिंडी डीएसपी चौक, कोठला स्टॅन्ड, मंगलगेट, कापडबाजार मार्गे माकेंट यार्ड येथे मुक्कामी दाखल झाली आहे. मार्केट यार्ड येथे बाजार समितीच्या वतीने अक्षय कर्डिले यांनी स्वागत केले. शहरातील विविध मार्गावर या दिंडीचे स्वागत करण्यात आले. व्यापार्‍यांनी एकादशीनिमित्त वारकर्‍यांना खिचडी, व्हेपर, शेंगदाणे आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले.

दिंडीतील वारकर्‍यांची नगर तालुका बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये राहाण्याची व्यवस्था केली आहे. बहुतांश वारकरी शहरात विविध ठिकाणी विखुरले गेले आहे. महापालिकेच्या वतीने कृत्रिम शौचायलयाची व्यवस्था करण्यात आली. महिला वारकर्‍यांसाठी अंघोळीसाठी टेंटची व्यवस्था करण्यात आली आहे.

बाजार समितीच्या वतीने सोमवारी सकाळी नाष्टा, दिला जाणार आहे. सकाळी 10 वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानंतर हमाल पंचायतीच्या वतीने वारकर्‍यांना आमटी, भाकरी प्रसाद देण्यात येणार आहे. वारकर्‍यांसाठी हमाल पंचायतीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देखील तपासणी शिबीर तसेच औषधांचे वाटप केले जाणार आहे. दिंडी सोमवारी (दि.23) मार्केट यार्ड येथेचे मुक्कामी असणार आहे. मंगळवारी सकाळी पालखी दिंडी साकतकडे प्रस्थान करणार आहे.

अहिल्यानगर शहरामार्गे पंढरपूरकडे जाणार्‍या बहुतांश दिंड्या अहिल्यानगर शहरामार्गे जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात हरिनामाचा जप सुरू आहे. त्यामुळे अवघी अहिल्यानगरी विठ्ठलमय झाले आहे.

पालखीतील वारकर्‍यांसाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच हमाल पंचायतीच्या वतीने पाणी, निवारा मंडप, कृत्रिम शौचालय आदींची व्यवस्था उत्तम केली आहे. सोमवारी सकाळी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जयंत महाराज गोसावी यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता साकतकडे प्रस्थान करणार आहोत.
अ‍ॅड. सोमनाथ घोटेकर, दिंडी प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT