Bhondu Baba Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Baba Fraud Case: भोंदू बाबाचा पर्दाफाश; 16 लाखांची फसवणूक व अत्याचार प्रकरणात अटक

भूतबाधेच्या नावाखाली महिलेची फसवणूक; अशोक आढावला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: भूतबाधेच्या पिडेपासून सुटका करण्यासाठी सुमारे 16 लाख रुपये उकळल्यानंतर शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदू बाबाला श्रीरामपूर पोलिसांनी टाकळीभान येथून अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक मधुकर आढाव असे पोलिसांनी अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. श्रीरामपूरच्या बेलापूर येथील गणेश महाराज या भोंदूला अटक केल्यानंतर टाकळीभान येथेही भोंदूगिरी उघडकीस आली.

त्रास होत असल्याने पिडित महिला 2023 मध्ये भोंदू अशोक आढावकडे गेली होती. भूतबाधा झाल्याचे सांगत भोदूने पिडा घालविण्यासाठी मंत्र तंत्राचे उपचार सुरू केले. त्यापोटी भोंदूने पिडित महिलेकडून ऑनलाईन 15 ते 16 लाख रुपये आणि सोनेही उकळले. 2025 मध्ये या महिलेसोबत भोंदूने अंगलट करत शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अशोक आढाव या भोंदूला अटक केली.

गुन्हा खोटा असल्याचा दावा

अटकेतील भोंदू अशोक आढाव यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिस निरीक्षक अशोक धनवडे, सरकारी वकील माडेकर यांनी त्याच्या आठ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र त्यास भोंदू आढावचे वकील आरीफ शेख, जावेद शेख यांनी आक्षेप घेतला. गुन्हा बनावट असून तो खोट्या आरोपातून करण्यात आला आहे. कायद्याचा दुरोपयोग करत ही फिर्याद दिल्याचा युक्तीवाद भोंदू आढावच्या वतीने ॲड शेख यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भोंदू आढाव यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

देवळालीतील विवाहिता अत्याचार प्रकरण रफादफा

श्रीरामपूरच्या भोंदूने देवळाली प्रवरेतील नवविवाहित महिलेला जाळ्यात ओढत तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण रफादफा करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यासाठी भोंदूला स्थानिक तरूणाने मदत केल्याची चर्चा असून या प्रकरणाची फेरचौकशीची मागणी पुढे आली आहे.

श्रीरामपुरात अटक केलेल्या भोंदूसाठी देवळालीतील स्थानिक तरूण एजंट म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे. त्याच्या घराशेजारील नवविवाहितेला या भोंदूने एजंट तरूणाकरवी जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. संबंधित पिडितेने पोलिसात तक्रार दिली, पण राजकीय दबावाचा वापर करत भोंदूने ते प्रकरण जागेवरच रफादफा केले. आता पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले जात आहेत. ‌‘मनी पॉवर‌’ वापरणाऱ्या या भोंदूने केलेल्या अत्याचार प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT